Madhurani Prabhulkar Emotional Video : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तब्बल पाच वर्षांनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. या मालिकेमुळे अनेक कलाकारांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील अरुंधती या महत्त्वपूर्ण भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत होती. मधुराणीला अरुंधती या पात्राने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. आज अरुंधती घराघरांत पोहोचली आहे. गेली पाच वर्षे मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
मालिका संपल्यानंतर अनेक कलाकार मंडळी भावुक होताना दिसले. अशातच मालिकेच्या सेटवरुन शेवटचा व्हिडीओ मधुराणीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मधुराणी भावुक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री असं बोलताना दिसत आहे की, “हॅलो, आज ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. खरंतर आम्ही सगळे खूप भावुक झालोय. हा दिवस कधीतरी येणार आहे हे माहीत होतं, पण तो दिवस येऊन ठेपल्यावर मनाची अवस्था फार विचित्र आहे. कारण पाच वर्ष सातत्याने रोज आम्ही हे काम करतोय. महिन्याचे वीस-बावीस दिवस कधी त्यापेक्षाही जास्त दिवस काम करतोय”.
पुढे तिने असं म्हटलं आहे की, “हा सेट, ही मेकअप रुम आमचं घर आहे. सकाळी उठल्यावर आम्ही इथे येतो. मेकअपला बसतो आणि जसा जसा मेकअप चेहऱ्यावर चढतो, जसे केस तयार होतात, तसतशी अरुंधती आरशात सापडायला लागते आणि मधुराणीची नकळत अरुंधती व्हायला लागते. हा गेल्या पाच वर्षांचा प्रवास आहे. यात सगळ्यात मोठा वाटा मेकअप आर्टिस्टचा आहे. मला असं वाटतं की, कलाकाराला कॅरॅक्टर सापडताना तयार होण्याची जी प्रोसेस असते, त्यात त्यांचा खूप मोठा वाटा असतो”.
शेवटी अरुंधतीने असं म्हटलं की, “मी अरुंधतीला शेवटची भेटतेय, शेवटची तयार होतेय. हा खूप भावनिक क्षण आहे. या मेकअप रुमच्या भिंतींनी पाच वर्ष काय काय ऐकलंय, काय पाहिलंय काय माहीत. मी व अपूर्वा ही रुम शेअर करतो. इतक्या गोष्टी शेअर केल्या आहेत. आनंदाचे क्षण, भावुक क्षण, काही हळवे क्षण या सगळ्याला या भिंती पाच वर्षे साक्ष आहेत. आमच्यात होत जाणाऱ्या बदलांच्या, वाढीच्या साक्ष आहेत. या भिंतींनी, या आरशाने सांभाळून घेतलं आहे”.