स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायमच अव्वल स्थानावर असते. मालिकेतील अर्जुन व सायली या पात्रांना प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळत आहे. मालिकेत सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारलं आहे तर अर्जुन हे पात्र अभिनेता अमित भानुशालीने साकारलं आहे. या दोन मुख्य पात्रांसाह पूर्णा आजी हे पात्रदेखील प्रेक्षकांचे आवडते पात्र आहे.
गेले काही दिवस पूर्णा आजी मालिकेत दिसत नसल्यामुळे अनेक प्रेक्षक मंडळी मालिकेत पूर्णा आजीच्या एण्ट्रीची वाट पाहत होते. अशातच मालिकेत पूर्णा आजीची एण्ट्रीही झाली आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत पूर्णा आजी देवदर्शनानिमित्त बाहेर गेल्याचं दाखवण्यात येत होतं. पण, प्रत्यक्षात प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतल्याचं त्यांची मुलगी व लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितलं होतं.
अखेर आजारपणातून ठणठणीत बऱ्या होऊन आता पूर्णा आजी पुन्हा एकदा मालिकेमध्ये परतल्या आहेत. पूर्णा आजीने मालिकेत पुन्हा एण्ट्री घेताच तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. “पूर्णा आजीची दमदार रिएन्ट्री, तू लढ!” असं अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, चाहतेदेखील गेल्या काही भागांपासून पूर्णा आजीची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे मालिकेत पूर्णा आजीच्या पुन्हा येण्याने प्रेक्षकांना भलताच आनंद झाला आहे. तसेच पूर्णा आजीच्या येण्याने आता मालिकेत आणखी नवीन ट्विस्ट येणार याचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.