मराठी मनोरंबजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे मनोरंजन सृष्टीत कामही करतात व आपले समाजभानही जपतात. अशीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. क्रांती ही सोशल मीडियावरील कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. क्रांती सध्या मनोरंजन सृष्टीत फार कार्यरत नाही. पण ती तिचा हा अमूल्य वेळ समाजकार्यांत व लोकांची सेवा करण्यात रुजवत आहे असं म्हणायला हरकत नाही. क्रांती रेडकर तिचे पती समीर वानखेडे यांच्याबरोबर समाजकार्यात आपला हातभार लावत आहे.
काल (४ फेब्रुवारी) रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे कॅन्सरबद्दल जागरूकता वाढविणे. तसेच, या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना नवी आशा देणे असा आहे आणि हीच नवीन आशा देण्याचे प्रयत्न क्रांती व तिचे पती समीर वानखेडे यांनी केला आहे. कालच्या कर्करोग दिनाचे औचित्य साधत क्रांती व समीर यांनी कर्करोग्यांची सेवा केली. याचे काही खास क्षण क्रांतीने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीचं आजारपणानंतर कमबॅक, लाडकी लेक व अभिनेत्री खास पोस्ट शेअर करत म्हणाली…
क्रांतीने तिच्या सोशल मीडियावर कर्करोग्यांची सेवा करतानाचे काही खास क्षण शेअर करत असे म्हटले आहे की, “जागतिक कर्करोग दिनानिमित्त आम्हाला सत्यार्थी फाउंडेशन, संत घाडगे महाराज संस्था येथे काही कर्करोग रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळाला. या प्राणघातक आजाराने प्रभावित झालेल्या अनेक लोकांचे आणि कुटुंबांचे सर्व दु:ख दूर करण्यासाठी आणि जगभरातील सर्व कर्करोग रुग्णांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व प्रार्थना व्यक्त करतो.”
या व्हिडीओमध्ये क्रांती रेडकर तिच्या पतीसह कर्करोग्यांना अन्नदान करत असताना पाहायला मिळत आहे. तसेच तिने तिथल्या कर्करोग्यांसह संवादही साधला. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत. दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये तिच्या या समाजभान जपणाऱ्या कृतीचे कौतुकही केलं आहे.