नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बराच चर्चेत असलेला पाहायला मिळतो. चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याबाबतचे अपडेट समोर येत असतात. अशातच आता चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत कोण दिसणार हे समोर आलं आहे. या चित्रपटात रामची आई कौशल्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. तसेच ‘रामायण’ हा चित्रपट २०२५च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासंबंधीची अधिकृत घोषणा एप्रिलमध्ये केली जाऊ शकते. (Ramayan Movie Cast Update)
लोकप्रिय चित्रपट व टीव्ही अभिनेत्री इंदिरा कृष्णन ‘रामायण’मध्ये कौशल्याची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या इंदिरा कृष्णन ‘ध्रुव तारा: समय सादी से परे’ या टीव्ही मालिकेत राजमाता दुर्गावतीची भूमिका साकारत आहेत. अभिनेता रणबीर कपूर ‘रामायण’ या चित्रपटात भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी अभिनेता त्याच्या देहबोलीवर विशेष काम करत आहे. भूमिकेसाठी तो तिरंदाजीही शिकत आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत तर यश लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. शूर्पणखाच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगच्या नावाची चर्चा आहे. तर कौशल्याच्या भूमिकेसाठी इंदिरा कृष्णन यांचे नाव पुढे आले आहे.
या चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने ‘इटाइम्स टीव्ही’ला सांगितले की, निर्मात्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांना कौशल्याच्या भूमिकेसाठी कास्ट केले आहे. इंदिरा शेवटच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात दिसल्या होत्या, ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. यामध्ये त्या रणबीरच्या सासूच्या आणि रश्मिका मंदान्नाच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या.
सूत्रांनी सांगितले की, रणबीर कपूरने ‘रामायण’मधील कौशल्याच्या भूमिकेसाठी इंदिरा कृष्णन यांचे नाव सुचवले होते. मात्र, याबाबत इंदिराजींच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण इंदिरा यांनी अलीकडेच एका चित्रपटाच्या वाचन सत्रातील रणबीर कपूरबरोबरचा सेल्फी शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये ती ‘रामायण’मध्ये काही महत्त्वाची भूमिका करत आहे का, असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.