देशभरात दिवाळी अगदी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सोशल मीडियाद्वारे तर कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबियांबरोबरचे फोटो शेअर करत आहेत. तसेच चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी वेळात वेळ काढून त्यांच्या कुटुंबियांबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले. काहींनी नवी कार खरेदी केली तर काहींनी स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं. दरम्यान अभिनेत्री हेमांगी कवीने घरीच पतीसह दिवाळीचा पहिला दिवस उत्साहात साजरा केला. (Hemangi Kavi answered to trollers)
हेमांगीने दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. या फोटोंमध्ये तिच्या घराचीही झलक पाहायला मिळाली. हेमांगीने तिच्या घरातील लक्ष्मीपूजनाचाही व्हिडीओ शेअर केला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिने पारंपरिक लूक केला होता. तसेच तिच्या सुंदर लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. नवऱ्यासह पोझ देत तिने फोटो क्लिक केलं.
दरम्यान लक्ष्मीपूजनाचा फोटो शेअर केल्यानंतर हेमांगीला मात्र ट्रोल करण्यात आलं आहे. हेमांगीने नवऱ्याबरोबर शेअर केलेल्या फोटोला एक कॅप्शन दिलं. या कॅप्शनमध्ये होणार असा शब्द असणं अपेक्षित होतं. हेमांगीने होणारे असा शब्द लिहिला. तिची हिच चूक नेटकऱ्याने पकडली. “मी तुझी लक्ष्मी. तू माझ्याकडेच पाहा. होणारे मीच प्रसन्न ऐक सल्ला हा महा. बाकी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होवो याच शुभेच्छा” असं कॅप्शन हेमांगीने दिलं. यावर नेटकऱ्याने म्हटलं की, “होणारे नाही हो होणार हवं. आणि हे मराठी कलाकार”.
हे देखील वाचा – ‘आई कुठे…’ फेम मधुराणी प्रभूलकरला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शाबासकीची थाप, फोटो शेअर करत म्हणाली, “अक्षरशः…”
हेमांगीने या कमेंटवर अगदी सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, “बाकी व्यवस्थित लिहिलं ते दिसत नाही. एखाद्याने किती नकारात्मक असावं नाही का… मोठ्या सफेद रंगाच्या कॅनव्हासवर सुक्ष्म काळा रंगाचा ठिपका बघणारे हे लोक”. हेमांगीने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर देत ट्रोल करणाऱ्याची बोलती बंद केली.