अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. २५ डिसेंबर रोजी गौतमी व स्वानंद यांनी लग्नगाठ बांधली. गौतमी व स्वानंद यांनी एका रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा उरकला. या छोटेखानी समारंभात त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना व मित्रपरिवाराला आमंत्रित करण्यात आलं होतं. अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती. अत्यंत शाही थाटामाटात त्यांचा हा विवाहसोहळा संपन्न झाला. (Gautami Deshpande And Swanand Tendulkar Lovestory)
गौतमी व स्वानंद यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली नाही. तरीदेखील दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. अखेर गौतमीने थेट मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत स्वानंद बरोबरच्या नात्याचा खुलासा केला. गेले बरेच दिवस गौतमीच्या लग्नाची लगीनघाई सुरु होती. अखेर ती विवाहबद्ध झाली आहे. गौतमी लोकप्रिय कन्टेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकर याच्यासह लग्नबंधनात अडकली आहे.
गौतमी -स्वानंदच्या लग्नसोहळ्यातील अनेक खास क्षण सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. अशातच गौतमी व स्वानंदच्या लव्हस्टोरीचा खुलासाही एका व्हिडीओमधून करण्यात आला आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यांत गौतमीच्या शाही विवाहसोहळ्याची खास झलक पाहायला मिळाली. या व्हिडीओमधून गौतमी व स्वानंदची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली हे समोर आलं.
स्वानंदने त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात करत म्हटलं, “मुळातच मला ती बघूनच आवडली होती. हे मी याआधी सांगितलं नव्हतं पण आता सांगत आहे, मी तिला विचारलं की, आपण डेटवर जाऊया का? यावर तिने स्पष्ट नाही म्हटलं” असं तो म्हणाला. यावर गौतमीने प्रेमाचा खुलासा करत सांगितलं, “यानंतर थोडीशी मैत्री वाढली, आमचं बोलणं सुरु झालं, बोलणं वाढलं, त्याच्यानंतर मला तो जास्त आवडायला लागला. आणि मला नंतर कळलं की, हे सर्व मस्त सुरु आहे, खूप गोड आहे” असं म्हणत त्यांचे नेमके कसे सूर जुळले याबद्दल सांगितलं.