ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने नुकतीच पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली. तिच्या या घोषणेमुळे चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ईशा व भरत यांनी नुकतेच एक संयुक्त निवेदन जारी केले होते. या संयुक्त निवेदनातून त्यांनी “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे” असं म्हणत त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती.
ईशा व भरतच्या विभक्त होण्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला असला तरी त्यांच्या नात्यात आधीपासूनच दुरावा होता असं काही वृत्तांनुसार म्हटले जात आहे. ईशा व भरत यांचं नातं अचानक तुटलं नाही, तर गेल्या बऱ्याच काळापासून त्यांच्या नात्यात तणाव होता आणि याच कारणामुळे हेमा मालिनी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या पार्टीला भरत कुठेच दिसला नव्हता.
झूम एंटरटेनमेंटने एका अहवालात म्हटले आहे की, ईशा व भारत यांनी खूप आधीच वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता, पण ते त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. तसेच ईशा व भरतने आधीच आपले मार्ग वेगळे केले होते. म्हणूनच देओल कुटुंबाला त्यांच्या या निर्णयाविषयी काही आश्चर्य वाटलं नाही.
ईशा व भरत यांच्या घटस्फोटाच्या या निर्णयात हेमा मालिनी या त्यांच्या मुलीच्या बाजूने आहेत, असंही म्हटलं जात आहे. मुलीच्या कोणत्याच निर्णयात त्या हस्तक्षेप करणार नाहीत, असं त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे. घटस्फोट घेणे हा ईशा व भरत यांचा खासगी निर्णय असल्याने त्यावर त्या कधीच भाष्य करणार नाहीत, असंही म्हटलं जात आहे.
दरम्यान, ईशा देओलने जून २०१२ मध्ये भरतशी लग्न केले होते. मुंबईच्या इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणाने त्यांचा विवाह पार पडला होता. लग्नाच्या १२ वर्षानंतर हे दोघे वेगळे झाले असून दोघांनी परस्पर संमतीने त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.