नुकताच झी मराठीचा ‘झी नाट्य गौरव’ सोहळा अगदी दिमाखात पार पडला. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. या सोहळ्याला पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन कार्यक्रमाचे बरेच फोटो, व्हिडीओ पोस्ट केले. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -व्यावसायिक नाटक या कॅटेगिरीसाठी अवॉर्ड मिळाला. ही अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख. (Amruta Deshmukh On Zee Natya Gaurav Award)
अमृताला नाटक विश्वासाठी एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. सध्या अमृता नाटकविश्वात रमलेली दिसत आहे. अमृताने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अमृता ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या अमृता तिच्या अभिनयाने रंगभूमी गाजवताना दिसत आहे. नाटकांसाठी विविध ठिकाणी ती दौरेही करताना पाहायला मिळते. या नाटकविश्वातील अमृताची कामगिरी पाहता तिला झी नाट्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
हा पुरस्कार स्वीकारतानाचा एक फोटो शेअर करत अमृताने लिहिलं आहे की, “‘झी नाट्य गौरव’ हा असा सोहळा आहे जो मी आमच्या छोट्याश्या टीव्हीवर उत्साहाने बघायचे.आणि तिथे असण्याची स्वप्नसुद्धा बघायचे. कितीही नाट्यमय वाटलं तरी खरंच होतं तसं. आता जेव्हा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- व्यावसायिक नाटक’ ची ट्रॉफी माझ्या हातात आली तेव्हा आयुष्य एखाद्या नाटकापेक्षा कमी वाटत नाही. ज्यांनी ही संधी दिली ते प्रशांत दामले सर आणि माझं नाव ‘नियम व अटी लागू’साठी त्यांना सुचवणारी कविता ताई यांच्याच हस्ते हा पुरस्कार मला मिळाला हा निव्वळ योगायोग”.
पुढे अमृता म्हणाली, “खरं सांगायचं तर हे दोघे स्टेजवर आले तेव्हा तर माझी खात्रीच पटली की ‘छे! असा योग खऱ्या आयुष्यात नाहीच, येत’, आणि म्हणूनच वाटतं ‘क्या पता हम में है कहानी या हैं कहानी में हम?'”, असं म्हणत तिने आनंद व्यक्त केला आहे. अमृताला हा पुरस्कार ‘नियम व अटी लागू’ या तिच्या नाटकासाठी मिळाला आहे.