सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Artificial Intelligence) चर्चा सुरू आहे. अशातच छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तिरेखेसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत AI चा वापर होणार आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे हा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अभिनेता सुबोध भावेने याआधी चित्रपटात, मालिकेत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच तो आता ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात सुबोधच्या तरुणपणातील भूमिकेसाठी मालिकेत AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या AI च्या वापराबाबत अनेक मतमतांतरे समोर येत आहेत. अनेकजण त्याच्या सकारात्मक पैलूबाबतही बोलताना दिसतात. तर काहींनी याबाबत विरोधाचा सुर आळवल्याचेही पाहायला मिळाले.
अशातच AI च्या वापराबाबत सुबोध भावेने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. नुकताच सुबोधने त्याच्या आगामी ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या निमित्ताने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी AI च्या वापराबद्दल भूमिका स्पष्ट करताना सुबोधने असं म्हटलं की, “AI च्या वापरामुळे कुणाच्या पोटावर आणलेला नाही. लहानपण मीच करायचं असं जर ठरवलं असतं तर कुणाला घेणार होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की नवीन कलाकारांच्या पोटावर पाय आहे असं म्हणत आहात, तर सध्या ३५ मालिका सुरु आहेत, त्यापैकी एका मालिकेत मी काम करत आहे. म्हणजे ३४ कलाकारांच्या पोटावर मी पाय दिलेला नाही ना? आणि मीदेखील एक अभिनेता आहे, त्यामुळे जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मी अभिनय करत राहणार आहे”.
यापुढे सुबोध भावेने असं म्हटलं की, “त्यामुळे पोटावर पाय वगैरे हा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरचा शहाणपणा मला शिकवू नका. मीदेखील अनेक गोष्टींचा सोडून, अनेक गोष्टींचा त्याग करुन इथे कलाकार म्हणून आलो आहे. माझे हजार व्यवसाय नाहीत. माझं दुकान पण आहे. बिल्डर पण आहे आणि राजकारणातूनही मला पैसा येत आहे असं नाही. माझं पोट, माझं रक्त आणि माझा जीव फक्त अभिनयावरच आहे त्यामुळे मी हेच करत राहणार आहे. त्यामुळे नवीन कलाकारांच्या पोटावर पाय हा शहाणपणा दुसऱ्या कुणाला तरी शिकवा. मला शिकवू नका. मी इथे अभिनय करायला आलो आहे, जो मी मरेपर्यंत करणार”.
आणखी वाचा – जावईबापूंचा मानपान, सासु-सासऱ्यांची खास तयारी अन्…; सासरवाडीत प्रथमेश परबचे लाड, पत्नीने शेअर केले खास फोटो
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्मिला शिंदे या अभिनेत्रीनेही “कृपया एआयचा वापर टाळा आणि हाडामांसाचे कलाकार कास्ट करा. AI ला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एकसारखे दिसणारे कलाकार सापडतील” असं म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. अशातच सुबोध भावेने या AI च्या वापरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.