सध्या बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक चित्रपटांची रांग लागली आहे. बिग बजेट हिंदी सिनेमांच्या गर्दीत मराठी चित्रपटही काही मागे राहिलेले नाहीत. बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांनी आपला दबदबा निर्माण केलेला पाहायला मिळत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची भूमिका रसिक प्रेक्षकांना विशेष भावली. यानंतर आता सिद्धार्थ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होत आहे. (Siddharth Chandekar Ole Aale Movie Trailer)
सिद्धार्थ चांदेकर व नाना पाटेकर यांच्या ‘ओले आले’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट विशेष चर्चेत होता. अखेर ‘ओले आले’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ओले आले चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, नाना पाटेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरे हे कलाकार मुख्य भूमिकेत असलेले पाहायला मिळत आहेत.
‘ओले आले’ चित्रपटाच्या समोर आलेल्या ट्रेलरवरुन चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढून राहिली आहे. या चित्रपटात बाप-लेकाची अनोखी कथा पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ट्रेलरमध्ये नाना मुलाला सतत पैसे कमावण्याचा मागे पळू नकोस तर आनंदाने आयुष्यही जग असा सल्ला देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ट्रेलरमधील नाना पाटेकर यांचे मजेशीर संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच ५ जानेवारी २०२४ रोजी ‘ओले आले’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.