मराठी मालिका विश्वातील चॉकलेट बॉय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखलं जातं. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून शशांक छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच झळकला. त्यानंतर तो ‘हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याच्या या दोन्ही मालिकेतील भूमिकेमुळे तो प्रेक्षकांचा, विशेषकरून तरुणींचा आवडता झाला. पण केवळ मालिकांपुरतं मर्यादित न राहता त्याने अनेक चित्रपट व वेबसीरिजदेखील केले. सध्या शशांक स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ मालिकेत अक्षय मुकादम ही प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. (Shashank Ketkar share Muramba BTS Video)
दरम्यान, ‘मुरांबा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांना अक्षय व रमाच्या नात्यात दुरावा झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर अक्षय रमाचं मन जिंकण्यासाठी बरेच प्रयत्न करताना दिसत आहे. अशात ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आली असून मालिकेत लवकरच अक्षयचा मोठा अपघात घडताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या अपघाताचा एक बीटीएस व्हिडीओ नुकताच शशांकने इंस्टाग्रामवर शेअर केला. जो सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताना शशांकने “मुरांबा मालिकेत अक्षयचा अपघात झाला. तो कसा झाला, कोणी केला हेही तुम्ही पाहिलं. अक्षय हे खोटं पात्र साकारत असूनसुद्धा तुम्ही प्रेक्षकांनी अक्षयला अगदी खऱ्या शुभेच्छा दिल्या आणि रेवाला शिव्याही दिल्या. पण हे तुमच्या समोर येण्याआधी नक्की काय घडतं? ही पडद्यामागची गंमत, मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा प्रयत्न.”, असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
हे देखील वाचा – सासूबाईंची साडी नेसून रेड कार्पेटवर आली उर्मिला कोठारे, म्हणाली, “माझ्या सासरी…”
व्हिडिओच्या सुरुवातीला शशांक त्याच्या पात्राची व या सीनची माहिती त्याच्या चाहत्यांना देतो. तो यात म्हणाला, “हाय, आज तुमच्या लाडक्या अक्षय मुकादमचा अत्यंत महत्वाचा आणि भयानक असा सिक्वेन्स या फिल्मसिटीत शूट होत आहे. अक्षयच्या आयुष्यात एक मोठी घटना घडणार असून त्या घटनेमुळे बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. तर काय घडणार आहे, हे तुम्हाला या व्हिडिओतून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे. अर्थात हे सगळं तुम्हाला आमच्या एपिसोडसमधून कळणार आहे. पण हा माझा छोटासा प्रयत्न.” तर पुढे या व्हिडीओमध्ये तो हा सिक्वेन्स शूट करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – ‘फ्रेंड्स’ फेम प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन, हॉट टबमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ
शशांकचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत असून चाहते लाईक्स व कमेंट्सद्वारे त्याचं कौतुक करत आहे. एक चाहती या व्हिडिओवर म्हणाली, “तुझ्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे”. तर दुसरा चाहतीने “तू टिक आहे ना”, अशी कमेंट करत त्याला काळजी घेण्याचं सांगितलं आहे. तसेच आणखी एका चाहत्याने “लवकर बरा हो आणि रमा तुला लवकर भेटू दे” अशी कमेंट केली आहे. दरम्यान, अक्षयच्या अपघातानंतर मालिकेत पुढे काय पहायला मिळणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.