अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवार (१५ ऑक्टोबर) रोजी निधन झालं. कर्करोगाशी झुंज देऊन पुन्हा रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. पण अचानक आलेल्या आजारपणात त्यांनी या1जगाचा निरोप घेतला. अतुल परचुरे यांच्या जाण्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्या. तसेच त्यांच्या अत्यंदर्शनालाही संपूर्ण कलासृष्टी हजर होती. यावेळी अनेक कलाकारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. अतुल यांच्या जाण्यानं मनोरंजन पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. त्यांच्या जाण्यानंतर अनेकांनी त्यांच्याबरोबरच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. (Sankarshan Karhade On Atul Parchure)
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेदेखील अतुल परचुरे यांच्यासाठी पोस्ट करत त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. संकर्षणने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “अर्थपूर्ण बोलणारे अतुल सर. कायम लक्षात राहतील. मी त्यांच्याबरोबर कधीच काम केलं नाही, पण त्यांची काही वाक्यं आणि त्या वाक्यांमुळे “अतुल परचुरे सर” जन्मभर लक्षात राहतील. १ : लॉकडाऊन मध्ये मला त्यांचा फोन आला; “काय रे बरा आहेस का? काहीही लागलं तर मला सांग…” मी म्हणालो “असं का म्हणताय?” तर ते म्हणाले “अरे आम्ही इथेच जन्माला येतो, इथेच काम करतो. आमचं घर आहे. तू मुंबईबाहेरून आला आहेस. सध्या सगळं बंद असल्यामुळे घर, कुटूंब चालवायला अडचण येउ शकते. काही वाटलं तर मुंबईत अतुल आहे हे लक्षात ठेव”
यापुढे संकर्षणने दुसरा प्रसंग सांगत असं म्हटलं की, “प्रसंग २ : ‘तू म्हणशील तसं’च्या २२७ व्या प्रयोगाला शिवाजी मंदिर, दादरला प्रयोग पहायला आले. मी म्हणालो, “सर, माझ्या कामाच्या बाबतीत, लिखाणाच्या बाबतीत काही सुचना करायच्या असतील तर प्लिज सांगा” तर ते म्हणाले, “२२७ प्रयोग प्रेक्षक नाटकाला आलेत ना… मग आता मी सूचना केल्या तर मी मुर्ख ठरेन. त्यामुळे आता मीच काय कुणीही काहीही येउन सुचना केली तरी ऐकु नको. प्रयोग करत रहा” प्रसंग ३ : मध्यंतरी मी दौऱ्यावर होतो म्हणुन ‘ड्रामा जूनिअर्स’ कार्यक्रमात परिक्षक म्हणुन अतुल सर गेले होते. तर मला फोन करुन म्हणाले, “आज माझं भाग्यं, मी तुझी रिप्लेसमेंट करून आलो”
यापुढे त्याने आणखी एक प्रसंग सांगत म्हटलं की, “यशवंत नाट्यसंकूल, माटूंगाच्या शुभारंभाचा वेळी भेटले. मी म्हणालो “आता बरे आहात का?” त्यावर त्यांचं उत्तर, “मी आता डोक्यातून आजार काढून टाकला आहे. त्यामुळे तुझ्या नाटकांत काम करण्याइतका बरा आहे”. या बोलण्याचा, मैत्री जपण्याचा आणि त्यांच्या अंगी असलेल्या अनेक गोष्टींचा मी फॅन होतो आहे आणि राहीन”. दरम्यान, संकर्षणच्या या पोस्टखाली अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली असून त्यांच्या निधनावर शोकही व्यक्त केला आहे.