मराठी मनोरंजनसृष्टीतील एक चतुरस्त्र कलाकार म्हणून आपण ज्याला ओळखतो तो कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, उत्तम निवेदक, उत्तम दिग्दर्शक व एक उत्तम माणूस म्हणून तो चांगलाच लोकप्रिय आहे. संकर्षणच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे आणि त्याच्या कवितांचे अनेक चाहते आहेत. संकर्षण त्याच्या अभिनय, लिखाण व सादरीकरणामुळे जितका ओळखला जातो. तितकाच तो त्याच्या कवितांसाठीही ओळखला जातो. संकर्षणच्या अनेक कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपल्या कविता व अभिनयामधून चर्चेत राहणारा संकर्षण त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर तो कवितांचे कार्यक्रम करत असतो. त्यांचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे. याच कार्यक्रमानिमित्त संकर्षण परदेशात गेला असून आजच्या आषाढी वारीला तो भारतात नाही. त्यामुळे अभिनेता भारत व आजच्या आषाढी एकादशीच्या या खास दिवसाला खूप मिस करत होता. मात्र संकर्षणची ही इच्छा साक्षात विठुरायाने पूर्ण केली आहे असं म्हणायला हरकत नाही. संकर्षणला परदेशात विठ्ठल पूजेचा मान मिळाला असून त्याने त्याच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमेरिकेतील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे खास फोटो शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “यावर्षीच्या आषाढी एकादशीला भारतात नाही. सारखं मनांत वाटत होतं की, “दर्शन कुठे घ्यावं?. ऊपवास कसा करावा?” पण अमेरिकेत ऑस्टीनमध्ये प्रयोग करायला आलो आणि तिथल्या मंडळाने प्रयोग सुरु करायच्या आधी विचारलं की, “आम्ही दरवर्षी पांडूरंगाची पूजा करतो, दिंडी आयोजित करतो. तर तुम्ही पुजेचा मान घ्याल का?” असं विचारलं. मला असं वाटलं की, विठ्ठलानेच साद घातली”.
आणखी वाचा – Video : हेचि दान देगा देवा! विठ्ठल भक्तीत रमले आदेश बांदेकर, अन्नदानही केलं अन्…; साधेपणाचं होतंय कौतुक
पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “विठ्ठलाची हाक जोवर वैंकुठातून येत नाही. कित्तीही ठरवा तुम्ही, पाऊल पंढरीकडे जात नाही. लाखो पाऊलं चालून, जेव्हा भेट ऊराऊरी होते. पांडूरंग करतो स्वागत आणि तेंव्हा खरी वारी होते”. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याला कमेंट्सद्वारे भाग्यवान म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्सद्वारे अभिनेत्याचे कौतुक केले आहे आणि त्याला आषाढी एकादशीच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.