Riteish Deshmukh Maratha support : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून आंदोलकांनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट पासून आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली. अगदी पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे असंख्य आंदोलकांचे हाल झाले. पावसामुळे आंदोलकांचे हाल होत आहेत मात्र सरकारकडून चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आजच्या दिवशी सरकारकडून काय हालचाली होतात का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
राजकीय क्षेत्रासह मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरुन आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान मनोरंजन क्षेत्रातूनही या आंदोलनावर कलाकार मंडळींनी आपले मत व्यक्त केले आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळावा अशी मागणी अभिनेता रितेश देशमुखने केली आहे. रितेशने ट्विटरवर पोस्ट शेअर करत मनोज जरांगेच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – “विनंती समजा किंवा चेतावणी”, ‘ठरलं तर…’च्या एपिसोडवरुन फॅनपेजेसवर भडकली जुई गडकरी, म्हणाली, “नियमांचं…”
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो… pic.twitter.com/1lIELovdJC
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 29, 2025
रितेश म्हणाला, “सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गान मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. मनोज जरांगेजी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.”
मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रभरातून आंदोलनकर्ते मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागातून शेकडो वाहने मुंबईत येत असल्याने आणि सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु असताना मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. यामुळेच सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरुप आपल्या घरी परतावेत अशी प्रार्थना रितेशने या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.





