सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच लवकरच एक मराठमोळा व लोकप्रिय अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. ‘टाइमपास’ या चित्रपटातून दगडू या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेश लवकरच लग्नबंधनात अडकणार असून प्रथमेशच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेत्याच्या हळदी समारंभाच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. (Prathamesh Parab Haldi Ceremony)
प्रथमेश परबच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले असून प्रथमेशला त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरच्या नावाची हळद लागली आहे. येत्या २४ तारखेला प्रथमेश-क्षितिजा लग्न बंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अशातच प्रथमेशच्या हळदी समारंभातल्या फोटोंनी व व्हिडीओ समोर आले आहेत. ‘ही पोरी साजुक तुपातल’ या गाण्यावर ठेका धरत प्रथमेशसह त्यांच्या मित्रमंडळींनी धरलेला ठेका साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
हळदीने माखलेल्या अंगानं प्रथमेश स्वतःच्याच हळदीत मनसोक्त नाचताना दिसला. मित्र परिवाराच्या व कुटुंबीयांच्या उपस्थितीत प्रथमेशचा थाटामाटात हळदी समारंभ पार पडलेला पाहायला मिळत आहे. यावेळी सिनेसृष्टीतीलही कलाकार मंडळींनी प्रथमेशच्या हळदीला हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. अभिनेता अक्षय केळकरने प्रथमेशला खांद्यावर उचलून घेत ठेका धरतानाही पाहायला मिळालं. प्रथमेशचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.
तर एकीकडे प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोने म्हणजे क्षितिजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन प्रथमेशच्या नावाची मेहंदी लागल्याचे फोटोही सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश व क्षितिजा घोसाळकरचा साखरपुडा समारंभ अगदी थाटामाटात पार पडला. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत त्यांनी त्यांच्या प्रेमाच एक पाऊल पुढे टाकलं. दोघांच्या साखरपुडा समारंभातीलही फोटो विशेष चर्चेत राहिले. कोणताही अवाढव्य खर्च न करता अत्यंत साधेपणाने त्यांचा हा साखरपुडा समारंभ उरकला.