पुण्यात नाट्यरसिकांची कमी नाही असं म्हणतात. पण पुण्यामध्ये रसिक प्रेक्षकांना नाटकांचा आस्वाद घेता यावा तेथील प्रशासकीय अधिकारीही प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एक प्रशासकीय अधिकारी म्हणजे पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.विकास ढाकणे. ते एक मोठे नाट्यरसिक आहेत. त्यांच्या नाट्यप्रेमामुळे पुण्यातील ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ व ‘अण्णाभाऊ साठे नाट्यगृह’ हे योग्य स्थितीत आणण्यासाठी त्यांनी मोठा हातभार लागला आहे. अशातच त्यांची आता बदली झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (prashant damale post)
पुणे महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांची एकाचा वेळी बदली झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. डॉ.कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली करण्यात आली असल्याने अभिनेते प्रशांत दामले यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे आणि त्यांच्यासाठी पोस्टही केली आहे.
प्रशांत यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणे यांच्या बदलीने धक्का बसला. सर्वसामान्य नागरिकांसाठी ते काम करायचेच पण त्याशिवाय आमच्यासाठी त्यांची ओळख उत्तम नाट्यरसिक अशीच होती आणि त्यांच्या रंगभूमीच्या प्रति असलेल्या प्रेमामुळे पुण्यातील ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ आणि ‘अण्णाभाऊ साठे नाट्यगृह’ सुस्थितीत आहेत. त्याचबरोबर आता ‘बालगंधर्व रंगमंदिर’ पण उत्तम स्थितीत येत आहे. विकास सर आम्ही तुम्हाला मिस करणार आहोत. तुम्ही परत याल अशी आशा बाळगतो”. प्रशांत यांच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
विकास ढाकणे यांची बदली झाल्यानंतर ही बदली रद्द व्हावी यासाठी नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील संस्था, संघटना ढाकणे यांची बदली रद्द व्हावी यासाठी मागणी करत आहेत. विकास ढाकणे यांनी सव्वा वर्षापूर्वी अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते स्वतः नाट्यरसिक असल्याने त्यांनी रसिकप्रेक्षकांसाठी खूप काम केले होते. दरम्यान प्रशांत दामले यांच्या पोस्टची काही दाखल घेण्यात येईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.