सध्या मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या कामाची छाप पाडताना दिसत आहेत. मराठी प्रेक्षकवर्गाच्या मनावर राज्य केल्यानंतर आता हिंदी व इतर भाषिक प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी काही कलाकार मंडळी सज्ज झाली आहेत. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता संग्राम साळवी याने देखील बॉलिवूड विश्वात आपलं नाव कमवायला सुरुवात केली आहे. आजवर संग्रामने अनेक मालिकांमधून रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. (Khushboo Tawde On Sangram Salvi)
मालिकाविश्वातून लोकप्रियतेस आलेला संग्राम आता हिंदी चित्रपटसृष्टीत रमलेला पाहायला मिळत आहे. सारा अली खानच्या ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपट सध्या चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटात संग्रामची झलक पाहायला मिळाली आहे. देशासाठी लढा देणाऱ्या या चित्रपटाचा संग्राम भाग झाल्याने त्यालाही अतिशय आनंद झाला आहे. संग्रामने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन साराबरोबरचा एक फोटो शेअर केला असून “एक आवाज, एक स्वप्न, एक देश, देशासाठीची लढाई सुरु”, असं कॅप्शन देत त्याने पोस्ट शेअर केली असून चाहत्यांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.
सदर पोस्ट संग्रामची बायको खुशबू तावडे हिनेदेखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने, “मला तुझा खूप अभिमान आहे. नक्की बघा ‘ए वतन मेरे वतन'”, असं म्हणत तिने तिच्या नवऱ्याचं भरभरुन कौतुक केलं आहे. संग्रामच्या या पोस्टवर ऋतुजा बागवे, सिद्धार्थ बोडके, गौरी नलावडे, नम्रता संभेराव, पल्लवी पाटील, सुयश टिळक, संग्राम समेळ या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. संग्रामला मोठ्या पडद्यावर पाहायला सगळेच उत्सुक आहेत.
संग्रामच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, संग्राम तुमच्यासाठी कायपण या ‘देवयानी’ मालिकेतील संवादाने खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आला. याशिवाय त्याने ‘आई माझी काळूबाई’, ‘गुलमोहर’, ‘सूर राहु दे’, ‘सरस्वती’, ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली. तर ‘मितवा’, ‘शेर शिवराज यांसारख्या मराठी चित्रपटातही त्याने काम केले आहे.