‘जयकांत शिकरे किसिसे नही डरता’ असं म्हणत ‘सिंघम’बरोबर वाद घालणारे अभिनेते प्रकाश राज यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपले नाव कमावले. पण याआधी त्यांनी सलमान खान बरोबर ‘वॉन्टेड’ या चित्रपटामध्येही केलेल्या आपल्या अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. पण त्यांची ओळख ही केवळ हिंदी चित्रपटांपूरती मर्यादित नसून त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये भूमिका करुन स्वतःला एक यशस्वी अभिनेता म्हणून सिद्ध केले आहे. आज त्यांचा ५९ वा वाढदिवस आहे. तसेच गेल्या ३८ वर्षांपासून त्यांनी मनोरंजन क्षेत्रामध्ये काम केले आहे. यानिमित्ताने त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊया. (prakash raj birthday special)
प्रकाश राज यांचा जन्म २६ मार्च १९६५ रोजी बंगळुरूमध्ये झाला. त्यांचे वडील हिंदू होते तर आई रोमन कॅथलिक होते. त्यांना प्रसाद राज नावाचा भाऊ आहे जो अभिनेता म्हणून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी शालेय शिक्षण सेंट जोसेफ इंडियन हाय स्कूलमधून पूर्ण केले होते. त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी बंगळुरूमधील सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून पूर्ण केले. मोठ्या पडद्यावर येण्याआधी त्यांनी थिएटरमध्ये काम केले. तसेच ते पथनाट्यामध्येही काम करत होते. यासाठी त्यांना महिन्याला ३०० रुपये मिळत असत. नंतर त्यांनी मालिकांमध्ये काम करण्यास सुरवात केली व त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
अनेक भाषांमध्ये काम करत असताना त्यांनी अनेकदा खलनायकाच्या भूमिका केल्या. त्यांच्या अनेक भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनयाव्यतिरिक्त दिग्दर्शनदेखील केले आहे. सलमानबरोबर २००९ साली ‘वॉन्टेड’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यांतर ते ‘सिंघम’, ‘दबंग २’, ‘मुंबई मिरर’, ‘पुलीसगिरी’, ‘हिरोपंती’, ‘जंजीर’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
आपल्या अभिनयाने जागा निर्माण करताना तेलुगू चित्रपट निर्माते प्रकाश यांना गैरवर्तन केल्याप्रकरणी सहा वेळा बंदी घातली गेली. याबद्दल विचारले असता ते म्हणतात की, “मी माझ्या नियमांचे पालन करतो. ते मी सोडू शकत नाही”. पण त्यांच्यावर काही मोठे अभिनेते व निर्मात्यांनी मिळून त्यांच्या विरोधात कटकारस्थान केल्याच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये होत होत्या. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या करिअरमध्ये एकही मॅनेजर ठेवला नाही. त्याबद्दल ते म्हणतात की, “मी इंडस्ट्रीमध्ये असा एकमेव अभिनेता आहे ज्याने आजवर मॅनेजर ठेवला नाही. मी फोन कॉल घेण्या पासून चित्रपटाची निवड, स्टोरी व फी हे सर्व मी ठरवतो. तसेच माझ्या उत्पन्नातील २०% भाग दानही करतो”.
१९९४साली त्यांनी अभिनेत्री ललिता कुमारीबरोबर लग्न केले. त्यानं मेघना, पूजा व सिद्धू अशी तीन मुलं होती. पण अचानक मुलाचा अपघाती मृत्यू झाला. मुलाची सतत आठवण येत असल्याचे ते नेहमी सांगतात. त्यानंतर काही काळानंतर त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि १२ वर्ष लहान असलेल्या नृत्यदिग्दर्शिका पोनीवर्मासह लग्न केले. त्यांना वेदांत नावाचा एक मुलगा आहे.
प्रकाश यांची एकूण संपत्ती ५० कोटी रुपये आहे. ते एका चित्रपटासाठी २.५० कोटी रुपये फी घेतात. त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांचे मुंबई व चेन्नई येथे घरं असून फार्महाऊसदेखील आहे.