‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘किल्ला’ या चित्रपटांतल्या उत्कृष्ट अभिनयामुळे आपल्या कामाची दखल घ्यायला भाग पाडणारा अभिनेता म्हणजे पार्थ भालेराव. ‘बॉईज’ या चित्रपटातून पार्थला आणखीनच लोकप्रियता मिळाली. आजवर केलेल्या अभिनयाच्या जोरावर पार्थने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते. अशातच आता पार्थ त्याच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. पार्थ हा अभिनेता आता लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Parth Bhalerao On Instagram)
पार्थने स्वत: सोशल मीडियाद्वारे याबद्दलची महिती दिली आहे. पार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याच्या नाटकाचे पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने पार्थ दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणाऱ्या या नाटकात अभिनेत्री रितिका श्रोत्रीची प्रमुख भूमिका असणार आहे. आता या नाटकाची चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
पार्थने त्याच्या पदर्पणाबद्दल प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, “ही कथा आहे १९७०च्या काळातील असून ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते?, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते? या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो? हे या नाटकात पाहायला मिळणार आहे. नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे.”
तसेच रितिकाने तिच्या भूमिकेबद्दल असे मात्र मांडले आहे की, “यापूर्वीही मी एकपात्री प्रयोग केला आहे. एका जागी प्रेक्षकांना १ तास खिळवून ठेवणे, हे मोठे कौशल्य आहे आणि ही ताकद कथेमध्ये असते. प्रत्येक क्षणी ही कथा अनपेक्षित वळण घेते. त्यामुळे या भूमिकेसाठी मी उत्सुक आहे.” येत्या १३ जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे ९ वाजता नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. त्यामुळे या नाटकासाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.