मकरसंक्रांतीनिमित्त ठिकाठिकाणी पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पंतग उडवताना आता नायलॉनचा मांजा हा दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात तिघांचा मृत्यू झाला. तर गुजरातमध्ये चार जण दगावले. बंदी असतानाही याचा वापर केल्याने राज्यात आठ जण जखमी झाले. त्यात उत्तर महाराष्ट्रातील सात तर नागपूरमध्ये कर्तव्यावर जात असलेल्या महिला पोलीस जखमी झाल्या. यावर आता अभिनेता जितेंद्र जोशीने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत जितेंद्रने याबद्दलची व्यथा मांडली आहे. अभिनेत्याने मांजामुळे दगावलेल्या व्यक्तींचे वृत्त वाचत यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Jitendra Joshi angry nylon manja)
जितेंद्रने या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “माझ्या चेहऱ्यावर एक खूण आहे ती मांजामुळे झालेली आहे. यामुळे मी मारही खाल्ला आहे, मी स्वत: पतंग उडवलेला आहे, तेव्हा काच वापरलेला मांजा येत असे. पण माझ्या मनात हा विचार येतो की मोठी माणसे असो किंवा लहान घरातील कुणी गेलं की वाईटच वाटतं. मग आपण सण साजरे करायचे नाहीत का? तर करायचे ना? पण मग हे सण साजरे करताना त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला नको का? त्रास म्हणजे लोकांचे जीव जात आहेत यात… या ठिकाणी माझी मुलगी, आई असती तर?”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “या पतंगाने एखाद्याचा जीव जात आहे. त्यामुळे मला पतंग उडवणाऱ्यांना हे सांगायचं आहे की, एखाद्या दिवशी तुमच्याही घरातील व्यक्ती असू शकते. जेव्हापासून मी बातमी वाचली आहे तेव्हापासून प्रचंड त्रास होत आहे. आज यात माझं नाव नाही म्हणून मी वाचू शकतोय. मी विनंती करतो आपल्या प्रशासनाला आणि माझ्या बंधु भगिनींना की हा नायलॉनचा मांजा विकू नका आणि विकत घेऊही नका. हे कुठून सुरु झालं माहीत नाही. पण हे सगळं थांबलं पाहिजे. मांजापेक्षा माणसं महत्त्वाची आहेत. त्यांचे जीव महत्वाचे आहेत. नायलॉन मांजावर बंदी आहे. खूप कठोर शिक्षा व्हायला हवी कारण हे जीव पुन्हा येणार नाहीत”.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या मुलांची शाळेत तोडफोड, मध्या-आभ्याला कांबळे सर साथ देणार का?
यापुढे त्याने भिवंडीमधील एका माणसाच्या व्हिडीओचा उल्लेख करत असं म्हटलं की, “त्याच्या गळ्यातून अक्षरश: रक्त सांडत होतं. आणि या व्हिडीओखाली एकजण कमेंट करत म्हणाला की, हा हिंदू सण आहे वगैरे… कुठला सण?. यात पण माणसं जात आहे. माझं म्हणणं आहे की यात कोणता माणूस जायला नको. मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, तिळगूळ घ्या, गोड बोला असे मॅसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा हे मॅसेज फॉरवर्ड करा की, शकतो पतंग उडवू नका आणि उडवायची असेल तर साधा धागा घ्या. हे खूप वाईट आहे.