बॉलिवूडमध्ये नेहमी विविध चित्रपट विविध कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यातील विनोदी चित्रपटांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये काही वेगळीच असते. या विनोदी चित्रपटांपैकी प्रेक्षकांच्या बराच पसंतीस पडलेला एक चित्रपट म्हणजे ‘वेलकम’. ‘वेलकम’ चित्रपटांचे गेले दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वेलकम’ हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या बराच पसंतीस पडला. त्यात नाना पाटेकर यांनी साकारलेली डॉन उदय शेट्टीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. (Nana patekar reaction on welcome franchise movie)
पुढे त्यांनी ‘वेलकम बॅक’ चित्रपटामध्येही मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘वेलकम’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्ये नाना कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक बरेच आतूर होते. नुकताच ‘वेलकम’ चित्रपटाच्या नवीन भागाची घोषणा करण्यात आली. पण या चित्रपटाचा नाना भाग नसल्याचं एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट केलं.
नाना मुख्य भूमिकेत असलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाना तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहेत. नुकताच विवेक अग्निहोत्री निर्मित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मुंबईत आयोजित या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात नाना पाटेकरही उपस्थित होते. त्यावेळी ते ‘वेलकम टू द जंगल’ या वेलकम चित्रपटाच्या तिसऱ्या भागात काम करत नसल्याचं स्पष्ट केलं. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर इंडियन एक्सप्रेसने त्यांना ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाचा भाग नसण्याबाबत विचारणा केली.
त्यावर उत्तर देताना नाना म्हणाले, “मी त्याचा भाग नाही, कदाचित त्यांना मी आता खूप म्हातारा झालो असं वाटत असेल”. पुढे त्यांनी विवेक अग्निहोत्रीकडे इशारा करत सांगितलं, “कदाचित त्याला वाटत नाही की मी इतकाही म्हातारा झालो आहे. म्हणून त्याने मला त्याच्या चित्रपटात काम दिलं”. नाना ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात कोवॅक्सिनचा शोध लावणाऱ्या टीमचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.