बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांच्या नावाचा उल्लेख केला. ज्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली. यात प्राजक्ताचं नाव घेतल्यामुळे हे प्रकरण खूप चिघळलं असून या प्रकरणी आता प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेत धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी प्राजक्ता माळी भावुकही झाली. प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक मराठी कलाकार तिला पाठिंबा देत आहेत. कलाकारांना अशा प्रकारे लक्ष्य करणं चुकीचं आहे, असं मत ते मांडत आहेत. (Kushal Badrike supported Prajakta Mali)
या संपूर्ण प्रकरणी आता विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेनेदेखील आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताला पाठिंबा दर्शवला आहे. कुशल त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “जाहीर निषेध” अशी पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टखाली त्याने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कुशलने या पोस्टखाली प्राजक्ताला समर्थन देताना असं म्हटलं आहे की, “कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा ३-४ वेळा परळीला गेलो आहे. काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुध्दा नाचताना कंबर हलवली. पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही, वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र काळजात ‘धस’ होत आहे”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू, बेडरुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं असं काय झालं?
यापुढे कुशलने असं म्हटलं आहे की, “स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेतसुद्धा एखाद्याला इंटरेस्ट यावा. बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध”. त्याचबरोबर या पुढे त्याने “प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे” असं म्हणत तिला आपला पाठींबा दर्शवला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, निर्माते नितीन वैद्य, मुग्धा गोडबले-रानडे यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच नृत्यांगणा गौतमी पाटीलनेही प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे. राज्यातील प्रसारमाध्यमं आणि राजकीय नेते यांचा विकृतीकडे प्रवास चालू झाला आहे. महाराष्ट्राने प्राजक्ता माळीसोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे. मला क्षेत्र किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील बदनामी ही पुरुषप्रधान मनोवृत्तीचाच एक भाग आहे, असे म्हणत त्यांनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे.