बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये ‘गोविंदा’ हे नाव आवर्जुन घेतलं जातं. ९०च्या दशकामध्ये गोविंदाच्या दमदार भूमिकांना प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. गोविंदाचा भाचा कृष्णा व भाची आरती सिंग यांनीदेखील चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं आणि दोघांना यशही मिळाले. मात्र गोविंदाच्या अजून एका भाचीचा अभिनयक्षेत्रातील संघर्ष मात्र तसाच राहिला. ‘ससुराल गेंदा फूल’,’राधा की बेटिया कुछ कर दिखयेगी’ या मालिकांमधून समोर आलेली रागिनी खन्ना ही गोविंदाची भाची आहे. मात्र बराच काळ रागिनी अभिनयापासून लांब आहे.रागिनीच्या मनात कोणती खंत आहे हे तिने माध्यमांशी बोलताना सांगितले. (Ragini Khanna on Govinda)
रागिनीने हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयक्षेत्राची सुरुवात केली. गोविंदाची भाची असूनदेखील तिला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. यावर रागिनी म्हणते की, “गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर माझे चांगले संबंध आहेत. गोविंदाची मुलं टीना अहुजा व यशवर्धन अहुजा यांच्यासह माझं नातं घट्ट आहे”. राखी पौर्णिमेला आम्ही भेटतो किंवा फोनवर बोलतो, असंही ती म्हणाली.
“मामाच्या प्रसिद्धीचा काही फायदा झाला का?” असे विचारले असता रागिनी म्हणाली, “नाही. गोंविदाची मी भाची आहे मुलगी नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा मला फायदा कसा होईल? माझं व मामाचं नातं फार चांगलं आहे. पण कामाच्या ठिकाणी आणि घरी हे नातं फार वेगळं आहे. हे नातं आम्ही कधीही कामामध्ये येऊ देत नाही. त्यांची मुलं कदाचित टेलिव्हिजनवर काम करणार नाहीत. पण मी करेन”.
पुढे रागिनी म्हणते की, “टीना अहुजा व यशवर्धन अहुजा यांच्याशीदेखील माझं नातं चांगलं आहे. आम्ही बाहेर भेटतो, एकत्र जेवतो, फिरतो पण कामाबद्दल आमची निवड वेगवेगळी आहे. गेल्या चार वर्षापासून मी चीची मामाला भेटले नाही. करोनानंतर आमचं भेटणं कमी झालं. मला वेळ मिळाला की मी मामाच्या घरी जाते. आम्ही एकत्र वेळ घालवतो. सुनीता मामीबरोबरही अनेकदा कार्यक्रमांमध्ये भेट होते”. याबरोबरच रगिनी टेलिव्हीजन क्षेत्राबद्दल बोलताना म्हणाली की, “टेलिव्हीजन इंडस्ट्रीला आजही बॉलिवूडपेक्षा कमी लेखले जाते. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. टेलीव्हीजनमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.” असे स्पष्ट केले आहे.