Ashok Saraf : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीला एक सुखद धक्का मिळाला आहे. अभिनेते अशोक यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून या यादीत महाराष्ट्रातली इतरही महत्त्वाची नावं आहेत. अशोक सराफ यांचं विनोदाचं टायमिंग जबरदस्त आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विश्वांमध्ये वावरलेले आणि अजूनही उत्तम टायमिंग साधत विनोद करणारे अशोक सराफ हे एक हरहुन्नरी कलाकार आहेत. आणि अशा कलाकाराला पद्मश्री पुरस्कार मिळणं ही कलासृष्टीसाठी अभिमानाचीच बाब आहे.
अशोक सराफ यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा मोलाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘एक डाव भुताचा’, ‘वजीर’, ‘भस्म्या’, ‘खरा वारसदार’, ‘धुमधडाका’, ‘गंमतजंमत’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ‘हम पाच’ या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील उत्तमोत्तम भूमिका साकारत नाव कमावलं आहे.
आणखी वाचा – संन्यास घेतलेल्या ममता कुलकर्णीचं बॉलिवूडशी आहे खास कनेक्शन, कुटुंबाविषयी अधिक जाणून घ्या…
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी एका वृत्तपत्राला पहिली प्रतिक्रिया दिली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान अशोक मामा म्हणाले, “मी आजपर्यंत जे काम केले केले, ते केवळ अभिनयाच्या आणि विनोदाच्या माध्यमातून लोकांचे हास्य आणि समाधान जपण्यासाठी केले. आज माझ्या कलेला मोठे मान्यतापत्र मिळाले आहे. माझे सहकारी, माझे कुटुंबीय, आणि मला प्रेरणा देणाऱ्या या क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराला हा पुरस्कार मी समर्पित करतो, असे अशोक सराफ यांनी नमूद केले. हा क्षण माझ्या आयुष्यभराच्या प्रवासाची एक सुंदर आठवण आहे, ज्यामुळे मी अधिक जोमाने काम करण्यासाठी तयार आहे”.
लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी, गझल गायक पंकज उधास यांना सन २०२५साठीचा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. याशिवाय पद्मश्री पुरस्कारांमध्ये अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई आदींचा समावेश आहे.