बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या खूप चर्चेत आल्या आहेत. २४ वर्षांपूर्वी त्यांनी मनोरंजन क्षेत्राला राम राम केला आणि केनियाला स्थायिक झाल्या. सध्या त्या भारतात परतल्या असून नुकत्याच प्रयागराज येथील कुंभमेळ्याला उपस्थित राहिल्या होत्या. मात्र त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिल्या. महाकुंभमेळ्यामध्ये त्यांनी संन्यास घेतला. संन्यासी बनण्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. यावेळी त्यांना महामंडलेश्वर ही उपाधी देण्यात आली आहे. त्यांनी हा संन्यास घेण्याचा स्वतःचा निर्णय असल्याचे सांगितले. महामंडलेश्वर दशनामी संप्रदायातील हिंदु भिक्षूंसाठी एक विशेष उपाधी आहे. यातील प्रमुख व्यक्ती सनातन धर्माचा प्रसार करतात. (mamta kulkarni family)
ममता यांचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे नाव आधी पद्मावती कुलकर्णी होते. त्यांचे शिक्षण मुंबईमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट येथे झाले. त्यांना आधी अभिनयामध्ये काहीही रस नव्हता. मात्र त्यांच्या आईने या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरित केले. आईचे स्वप्न होते की मुलीने अभिनेत्री व्हावं. त्यामुळे ममता यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. ‘रामायण’चे निर्माते रामानंद सागर यांनी ७० दशकामध्ये ममता यांच्या आईला आईच्या भूमिकेमध्ये घेण्याचा विचार केला होता मात्र लग्न होणार असल्यामुळे त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला.
आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत, तपासात मोठा खुलासा
ममता यांच्या वडिलांचे नाव मुकुंद कुलकर्णी आहे. त्यांची बहीण मुलीना कुलकर्णी १९९६ साली अभिनेत्री म्हणून समोर आल्या. त्यांनी काही कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेत्री तन्वी अजमी व ममता या एकमेकींच्या बहिणी आहेत. ममता यांनी आजवर लग्न केले नाही असं अनेकदा सांगितलं आहे. दुबईमधील अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्न केल्याच्याही अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र ममता यांनी या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले.
ममता यांनी १९९२ साली ‘तिरंगा’ या सुपरहिट चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांनी आजवर जवळपास ४० बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा’ है आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून तिने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. २००१ मध्ये रिलीज झालेला ‘छुपा रुस्तम’ हा त्यांचा शेवटचा हिट चित्रपट होता.