Udayanraje Bhosale On Chhava Movie : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित ‘छावा’ चित्रपटाची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट केव्हा येणार याची उत्सुकता पाहायला मिळाली. अखेर चित्रपटाच्या पोस्टर, टीजर, ट्रेलरने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. २२ जानेवारीला चित्रपटाचा भव्य दिव्य असा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर ‘छावा’ चित्रपटाचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळालं. दरम्यान विकी कौशलच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. पण या सगळ्यात काहींना चित्रपटाची कथा पटली नसल्याचं पाहायला मिळतंय. चित्रपटाच्या ट्रेलर मधील काही दृश्य ही महाराजांच्या प्रतिमेला शोभणारी नसल्याच म्हणत अनेकांनी चित्रपटाला घेऊन टीका केली असल्याचे समोर आलं आहे.
ट्रेलर पाहून या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. खासकरुन छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखविल्याने कोल्हापूरचे स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. हा चित्रपट इतिहास संशोधकांना आधी दाखवयला हवा होता असाही आक्षेप संभाजीराजे छत्रपतींनी घेतला होता. चित्रपटातील छत्रपती संभाजी राजांचे लेझीम गाण्यावर असणारे आक्षेपार्ह सीन हटवण्याच्या सूचना उदयनराजे यांनी दिग्दर्शकांना केल्या आहेत. यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी संबंधित सिन हटवण्याची ग्वाहीही दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन या चित्रपटात काही आक्षेपार्ह घटना जर दाखवल्या गेल्या असतील तर त्या हटविण्यात याव्यात असे म्हटले आहे.
आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर, पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले, “हा क्षण…”
उदयनराजे याबाबत फोनवर म्हणाले, “तुम्ही चित्रपटाचं दिग्दर्शन खूप सुंदर केलं आहे. त्यातले एखाद दुसरे दृश्य जे आहे ते आपण इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन केलं, तर आता कारण नसताना जी कॉन्ट्रोव्हर्सी होतेय ती संपेल”. यावर लक्ष्मण उतेकर उत्तर देत म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे किती थोर होते, हेच दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे तज्ज्ञांना दाखवून जे काही बदल करायचे आहेत, ते आपण नक्की करू.”आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना थेट फोनच लावला असून त्यांना काही सूचना केल्या आहेत.
अनेक नेटकरी या सीनबद्दल त्यांची मतं व्यक्त करत असतानाच मंत्री उदय सामंत यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. उदय सामंत यांनी “महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही” असं म्हणत जणू थेट इशाराच दिला आहे. एक्स अकाऊंटवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.