मनोरंजन क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. राजकरणासह मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेले प्रसिद्ध अभिनेते व राजकारणी विजयकांत यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. विजयकांत यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनासह राजकीय क्षेत्रातदेखील शोककळा पसरली आहे. विजयकांत यांनी वयाच्या ७१व्या वर्षी चेन्नईमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, त्यांना न्यूमोनिया झाल्याचे रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे. त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता २८ डिसेंबर म्हणजेच आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला. (Vijaykanth Death)
कमल हसन यांनी यावर विजयकांत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत असे म्हटले की, “तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता कॅप्टन विजयकांत यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. प्रत्येक गोष्ट ते माणुसकीने करायचे. त्यांच्या राजकीय कार्याने त्यांनी अनेकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी गरिबांनाही सढळ हाताने मदत केली. चित्रपटासह राजकारण क्षेत्रात कार्यरत असणारे कलाकार व एक उत्तम म्हणून विजयकांत आमच्या कायम स्मरणात राहतील.”
आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्यासह कोकणात पोहोचली गौतमी देशपांडे, माशांवर मारला ताव, साध्या लूकने वेधलं लक्ष
राजकारणात येण्यापूर्वी विजयकांत यांनी एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांनी ‘प्रामाणिक राज’, ‘त्यागम’ व ‘तमिझ सेल्वन’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीत १५४ हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. मनोरंजन क्षेत्रानंतर त्यांनी सप्टेंबर २००५ मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) या स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. २००६ मध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाग घेतला होता. त्यानंतर २०११च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने AIADMK बरोबर युती केली आणि बहुमत मिळवले होते.
आणखी वाचा – “राजकारण ही माझी आवड…”, राजकारणात प्रवेश करण्याबाबत माधुरी दीक्षितचा खुलासा, म्हणाली, “निवडणूक लढवणं…”
दरम्यान, विजयकांत यांच्या निधनाच्या बातमीने तमिळ चित्रपटसृष्टी, त्यांचा पक्ष डीएमडीकेचे सदस्य व त्यांच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. कमल हसन, ऐश्वर्या लक्ष्मीसह अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी ‘कॅप्टन’ विजयकांत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.