आपल्या निरागस अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांवरदेखील मोहिनी घालणारी अभिनेत्री म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित. माधुरीने आपल्या अभिनयासह नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. आजही तिच्या अभिनय, सौंदर्य व नृत्याचे अनेक चाहते आहेत. अशातच माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा नवीन मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच माधुरी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. माधुरी भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा झाली होती. त्यावर आता स्वत: माधुरीने या दोघांनीही मौन सोडलं आहे. (Madhuri Dixit On Politics)
‘पंचक’ चित्रपटाच्या निमित्ताने माधुरीने आपल्या पतीसह एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा त्यांना निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला असता माधुरीने यावर तिचे मत मांडले. या कार्यक्रमात माधुरीला “निवडणूक लढवणार का?” असा प्रश्न विचारला होता. यावर ती असं म्हणाली की, “निवडणूक लढवणं ही माझी बकेटलिस्ट नसून इतरांची आहे. प्रत्येक निवडणूकीदरम्यान मला कुठून तरी उभं केलं जातं. पण राजकारण ही माझी आवड नाही.”
आणखी वाचा – ‘मदर इंडिया’ फेम अभिनेते साजिद खान यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
यावर पती डॉ. श्रीराम नेने यांनीही भाष्य केलं. यावेळी ते असं म्हणाले की, “रोल मॉडेल हे समाजाला दिशा दाखवत असतात. व्यवस्थित वागलं आणि व्यवस्थित सगळ्यांचं केलं तर सगळं ठीक होईल. आरोग्य, शिक्षण आणि काही पायाभूत सुविधा झाल्या तर भारत पहिल्या क्रमांकावर येईल. आपल्या देशातील लोक खूप हुशार आहेत. राजकारण सोडून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येतं. राजकारण हा आमचा पिंड नाही. दररोज नवीन गोष्ट शिकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकांना मदत करायला आम्हा दोघांनाही आवडते.”
आणखी वाचा – “अजून काय हवं?”, सासरी पहिला उत्सव साजरा करण्यात रमली मुग्धा वैशंपायन, पोस्ट शेअर करत म्हणाली, “लग्नानंतर…”
माधुरी या निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा याआधी अनेकवेळा रंगल्या होत्या. मात्र आता यावर स्वत: अभिनेत्रीने तिचं मत व्यक्त केल्यामुळे ती राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. तिच्या राजकारणातील प्रवेशाच्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. दरम्यान, लवकरच तिचा ‘पंचक’ हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार असून तिच्या या आगामी चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.