मराठी सिनेसृष्टीत सध्या विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तिमत्वावर आधारित चित्रपट बनले जात आहे. त्यातही ज्यांनी मराठी कलाक्षेत्रात आपले योगदान दिले आहे, त्या महान कलावंतांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचा कल सध्या वाढत आहे. शाहीर साबळे, वसंतराव देशपांडे, डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या महान कलावंताचे जीवनपट प्रेक्षकांना आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. आता लवकरच आणखी एका मोठ्या कलावंताच्या जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ते म्हणजे, शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव लोकशाहीर पठ्ठे बापूराव. (Prasad Oak announced a Biopic)
श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर हे महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत ‘पठ्ठे बापूराव’ या नावाने प्रसिद्ध झाले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या अशा विपुल लावण्या रचल्या. त्यांच्या लावण्या आणि कवनं अनेक तमाशा फडातून गायल्या जात होत्या. मात्र त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत आणण्याचा विडा प्रसाद ओक यांनी उचलला आहे.
हे देखील वाचा – “माझी चप्पल अन् फॅारेनर यावर…” अमेरिकेतील फोटो शेअर करत पृथ्वीक प्रतापची भन्नाट पोस्ट, नेटकरी म्हणाले, “कॅप्शन वाचल्यानंतर…”
‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ व ‘चंद्रमुखी’ यांसारखे दर्जेदार चित्रपट देणारा अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक लवकरच ‘पठ्ठे बापूराव’ हा चित्रपट घेऊन येत आहे. ज्याचं फर्स्ट लुक घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे, प्रसाद पठ्ठे बापूराव यांच्या भूमिकेत दिसणार असून तोच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तर, अभिनेत्री अमृता खानविलकर ‘पवळा’च्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये केवळ प्रसाद दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये त्याच्यासह अमृता खानविलकर दिसत आहे. ‘चंद्रमुखी’नंतर हे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहे.
हे देखील वाचा – “त्यांना सांगणं चुकीचं होतं का असं…”, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना हेमांगी कवीबरोबर नेमकं काय घडलं?, म्हणाली, “अर्ध्या तासामध्येच मी…”
स्वरुप स्टुडिओज व डेस्टिनी प्रॉडक्शन्स या बॅनरअंतर्गत प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार, प्रकाश देवळे, सपना लालचंदानी यांनी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांचे, तर छायांकन संजय मेमाणे यांचे असणार आहे. प्रसाद व अमृता यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी कोण-कोण कलाकार झळकणार? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? हे समोर आले नाही. पण, ‘धर्मवीर’ नंतर प्रसाद पुन्हा एकदा जीवनपटामध्ये काम करताना दिसणार असून चाहते त्याला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहे.