मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला ‘सारं काही तिच्यासाठी# फेम श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर हा सुद्धा बोहल्यावर चढला होता. अभिषेकने सोशल मीडिया रिल स्टार सोनाली गुरवबरोबर लग्न केले. या दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांनी कोकणातल्या मालवण समुद्रकिनारी लग्नगाठ बांधली. अशातच त्यांच्या संपूर्ण लग्नसोहळ्यातील एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Abhishek Gaonkar and Sonalee Gurav wedding)
सोनाली-अभिषेक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. “प्रत्येकाचीच प्रेमकथा ही सुंदर असते, पण आम्हाला आमचीच प्रेमकथा जास्त आवडते” असं म्हणत दोघांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हळदी सोहळ्यापासून ते लग्न आणि लग्नानंतरचे रिसेप्शन अशा सगळ्या सोहळ्याची झलक पाहायला मिळत आहे. मालवणातील समुद्रकिनारी सुंदर ठिकाणी या दोघांनी लग्न केले होते. सजवलेलं मंडप, मित्रांचा कल्ला आणि धमाल मजामस्ती या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमधून दोघांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यावेळी अभिषेकने असं म्हटलं की, “दोघांनी एकमेकांना प्रपोज करण्याआधी प्रेम झालं होतं”. तर सोनालीने असं म्हटलं आहे की, “अभिषेकने मला प्रपोज केलं, पण त्याआधी मी सहा महिने त्याच्या मागे लागले होते. ६-७ महिन्यानंतर मला असं वाटलं की, माझं काम झालं आहे आणि मग त्याने मला प्रपोज केलं”. दरम्यान, दोघांच्या लग्नाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स द्वारे चांगलाच प्रतीसाद दिला आहे. अनेकांनी दोघांच्या लव्हस्टोरीचं कौतुकही केलं आहे.
अभिषेक गांवकर हा एक अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तर सोनाली गुरवच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती एक सोशल मीडिया रील स्टार आहे. सोशल मीडियावर ती मजेशीर व्हिडीओ बनवत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.