Abhishek Bachchan And Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड सिनेविश्वात नेहमीच चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक कपल म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन. ही लोकप्रिय जोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. ऐश्वर्या व अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अनेक बातम्या सतत कानावर पडत होत्या. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या व अभिषेक ही जोडी घटस्फोट घेणार असल्याचंही समोर आलं. या चर्चांवर दोघांपैकी कोणीही काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं. अशातच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन नुकतेच एका पार्टीत एकत्र दिसले. या कार्यक्रमातील त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांच्या या फोटोने त्यांच्या घटस्फोटाच्या अफवाही फेटाळून लावल्या आहेत.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन गुरुवारी रात्री आयेशा झुल्का, अनु रंजन आणि इतर सेलिब्रिटींबरोबर पोज देताना दिसले. यावेळी ऐश्वर्याची आई वृंदा रायही उपस्थित होती. फिल्ममेकर अनु रंजनने हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या सेल्फी घेत आहे आणि अभिषेक आणि तिची आई वृंदा पोज देत आहेत. फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खूप प्रेम”. या पार्टीत सचिन तेंडुलकर, तुषार कपूर आणि इतर सेलिब्रिटीही उपस्थित होते. याआधी ऐश्वर्या आणि अभिषेकने काही आठवड्यांपूर्वी त्यांची मुलगी आराध्याचा १३ वा वाढदिवसही एकत्र साजरा केला होता.
सुरुवातीला चाहत्यांनी असा अंदाज लावला की अभिषेक आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला नाही, परंतु नंतर एका व्हिडीओवरुन ते एकत्र असल्याचे समोर आले. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या अफवा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, “मी कुटुंबाबद्दल फार कमी बोलतो, कारण हे माझे क्षेत्र आहे आणि त्याची गोपनीयता मी सांभाळतो. अफवा म्हणजे अफवा. पडताळणीशिवाय अनुमान काढणे चूक आहे”. अभिषेक व ऐश्वर्याचे लग्न २००७ मध्ये झाले होते. २०११ मध्ये त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला.
आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना, त्यांनी मुलगी आराध्या बच्चनबरोबर घरी असल्याबद्दल पत्नी ऐश्वर्या रायचे आभार मानले. ऐश्वर्या मुलीचं संगोपन करतेय यासाठी अभिषेकने तिचे आभारही मानले आहेत. आणि बायकोचं कौतुक करत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरु असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.