आगामी लोकसभा निवणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आगामी निवडणुकींच्या तोंडावर अनेक लोक पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता गोविंदानेही नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. गोविंदाने शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती आणि अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदाच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
गोविंदा शिवसेनेकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रुपात शिवसेनेकडून नवीन चेहरा म्हणून गोविंदाला उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटात गेल्यानंतर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. १४ वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करत असल्याचे मत गोविंदाने व्यक्त केले. यावेळी त्याने असं म्हटलं आहे की, “२०१९ ला राजकारणातून बाहेर पडल्यानंतर मी पुन्हा या क्षेत्रात येईन असं मला वाटलं नव्हतं. पण माझ्या वनवासानंतर मी पुन्हा रामराज्य असलेल्या पक्षात येत आहे. त्यामुळे मला दिलेली ही जबादारी मी इमानदारीने पार पाडेन”.
दरम्यान, गोविंदाने २००४ साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. गोविंदाची प्रसिद्धी लक्षात घेता त्याला तिकीट देऊन काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. नंतरच्या काळात गोविंदाने राजकारणाला रामराम करत आपला मोर्चा पुन्हा एकदा अभिनयाकडे वळवला. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने राजकारणात एन्ट्री केली आहे.