फेब्रुवारी महिन्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते मंडळी या नवीन वेबसीरिजच्या प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्हीसुद्धा घरी बसून या वेबसीरिजचा आनंद घेऊ शकणार आहात. तर जाणून घेऊयात या महिन्यात कोणकोणत्या वेबसीरिज कुठे व कधी प्रदर्शित होणार आहेत…
आर्या ३ : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची बहुचर्चित वेबसीरिज ‘आर्या’ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ही वेबसीरिज हिट ठरल्यानंतर त्याचा पुढचा भाग ‘आर्या २’देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यालाही प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला. अशातच आता ‘आर्या २’चा पुढचा सीझन म्हणजेच ‘आर्या ३ अंतिम वार’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या ९ फेब्रुवारीला डिज्नी+हॉटस्टारवर ही सिरिज प्रदर्शित होणार आहे.

भक्षक : अभिनेत्री भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेला ‘भक्षक’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर ही पत्रकार वैशाली सिंहच्या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘सीआयडी’ फेम अभिजीत म्हणजेच आदित्य श्रीवास्तव खलनायक बन्सी साहूची भूमिका साकारणार आहे. तर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर यात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असही म्हटलं जात आहे. भूमीचा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

अवतार : द लास्ट एयरबेंडर : ‘अवतार: द लास्ट एयरबेंडर’ या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ही लाइव्ह अॅक्शन सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अल्बर्ट किम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेली ही वेबसीरिज येत्या २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

मेस्सीस वर्ल्ड कप : अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीवर आधारित असलेली ‘मेस्सीस वर्ल्ड कप’ ही डॉक्युमेंट्री येत्या २१ फेब्रुवारी रोजी एप्पल टीव्ही प्लस या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मेस्सीची जगभरातील अनेक चाहते मंडळी या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
