बॉलिवूड अभिनेता आमिर खान काहीना काही कारणावरुन कायमच चर्चेत राहत असतो. आपल्या चित्रपटामुळे व अभिनयामुळे चर्चेत राहणारा अभिनेता नुकताच त्याच्या एका कृतीमुळे चर्चेत आला असून यामुळे तो सोशल मीडियावर टीकेचा धनीही झाला आहे. आमिरने इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान हातात पाईप धरुन धूम्रपान केल्यामुळे सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचनिमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांशी खास संवाद साधला. मात्र इन्स्टाग्राम लाईव्ह आमिरने हातात पाईप धरत धूम्रपान केले. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.
या लाईव्हदरम्यान, एकाने आमिरला प्रश्न विचारत असे म्हटले की, “सर, तुम्ही ड्रग्जच्या आहारी आहात, ड्रग्ज घेणे बंद करा.” यावर आमिरने उत्तर देत असं म्हटलं की, “अरे नाही तुम्ही हे काय म्हणत आहात. तर आणखी एकाने “तुम्ही मुलगी आयरा खानच्या लग्नात डान्स केला नाही. पण अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये डन्स केलात” यावर अभिनेत्याने उत्तर दिले की, “अंबानी हे त्यांच्यासाठी एका कुटुंबासारखेच आहेत आणि मी माझ्या मुलीच्या लग्नातही डान्स केला होता.”
यापुढे आणखी एकाने तुम्ही ‘पठाण’, ‘जवान’सारखे चित्रपट बनवत नाही म्हणून त्याला प्रश्न विचारला. यावर आमिरने उत्तर देत असं म्हटलं की, “पठाण, जवानसारखे चित्रपट शाहरुख बनवतो, मी ‘लापता लेडीज’सारखे चित्रपट बनवतो तर तुम्ही ते पहा”. तसेच काहींनी त्याला त्याची फॅशन बदलण्याचादेखील सल्ला दिला आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये आमिरने वापरलेल्या लायटरवरुनही त्याला ट्रोल केले आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली “आमिर खानही आमच्यासारखाच दहा रुपयांचा लायटर वापरतो” असं म्हणत कमेंट्स केल्या आहेत.