‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रत्येक कलाकाराने स्वतःचा असा चाहतावर्ग निमार्ण केला आहे. प्रत्येक कलाकाराने अभिनयाच्या कलेवर चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. अशातच या कार्यक्रमातील लोकप्रिय व नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रताला ‘लॉली’ या पात्राने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सचिन गोस्वामी व प्रसाद खांडेकर यांच्या लेखणीतून लॉली हे पात्र साकारले गेले असून नम्रताने तिच्या अभिनयाने हे पात्र फुलवले आहे. (Namrata Sambherao Big Dream)
सोशल मीडियावरही नम्रता बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शिवाय अभिनेत्री तिच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओही पोस्ट करत असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा बरोबरच आता अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीकडेही आपली पावलं वळविली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात नम्रता पाहायला मिळाली. अशातच नम्रताने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नम्रताने सोशल मीडियावरुन आधी स्वतःचा फोटो शेअर करत, “माझं आणखी एक स्वप्न पूर्ण होतंय, थोड्या वेळात सांगते”, अशी पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा नम्रताच्या सोशल मीडियाकडे लागून राहिल्या होत्या. यानंतर नम्रताने तिच्या या स्वप्नाबाबत खुलासा करत एक पोस्ट शेअर केली आहे. लवकरच नम्रता एका भव्य चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होणार आहे. याची एक खास पोस्ट तिने शेअर केली आहे. नम्रताने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तिच्यासह मुक्ता बर्वेही पाहायला मिळत आहे.
नम्रताने ही पोस्ट शेअर करत लवकरच ती ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर करत तिने, “तर हे होतं माझं आणखी एक स्वप्न. स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच. ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे. मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी. या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करुन घेवून येत आहोत ‘नाच गं घुमा’”, असं कॅप्शन देत तिचं चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याचा स्वप्न पूर्ण झालं असल्याचं सांगितलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.