Dolly Sohi Passes Away : हिंदी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर येत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही यांचे निधन झाले आहे. काही तासांपूर्वीच डॉलीची बहीण अमनदीप सोहीचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच आणखी एका धक्कादायक बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अमनदीपनंतर आता डॉली सोहीचेही निधन झाले आहे. डॉली सोही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने त्रस्त होती. गेले काही दिवस तिच्यावर उपचारदेखील सुरु होते, मात्र अभिनेत्रीची ही झुंज अपयशी ठरली आहे. नुकतीच ETimes TV ने ही डॉलीच्या निधनाची माहिती सर्वांबरोबर शेअर केली आहे.
ETimes च्या वृत्तानुसार, डॉलीच्या कुटुंबियांनी डॉलीच्या निधनाची बातमी शेअर करत असं म्हटलं की, “आमची प्रिय डॉली आज पहाटे तिच्या स्वर्गीय निवासस्थानासाठी रवाना झाली आहे. तिच्या अचानक निघून जाण्यानं आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. आज दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.” अभिनेत्रीच्या कुटुंबासाठी हा काळ खूप कठीण आहे. अवघ्या काही तासांतच त्यांच्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डॉलीला काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारतदेखील होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला ‘झनक’हा शोदेखील सोडावा लागला होता. केमोथेरपीनंतर ती जास्त काळ शूटिंग करू शकली नाही. डॉलीने टीव्ही इंडस्ट्रीत दीर्घकाळ काम केले.
आणखी वाचा – राखी सावंतच्या पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल, ‘या’ ठिकाणी पार पडला विवाह सोहळा
दरम्यान, डॉलीची बहीण अमनदीपनेही काही तासांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला आहे. तिला काविळीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा आजार वाढत गेला आणि किडनी निकामी होऊन तिला आपले प्राण गमवावे लागले.