Aamir Khan Love : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहे आणि त्याला सुपरस्टार खानांपैकी एक मानले जाते. ९० च्या दशकात त्याचे आकर्षण इतके होते की, मुली त्याच्या सुंदर दिसण्यावर भाळायच्या आणि सलमानने एकदा मीडियाला सांगितले होते की मुलींमध्ये आमिरची प्रचंड क्रेझ आहे. आमिरची कारकीर्द उत्तम राहिली असली तरी त्याचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. त्याने दोनदा लग्न केले आहे, पण दोन्ही वेळा तो घटस्फोटामुळे चर्चेत राहिला. अशातच आता आमिर पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची बातमी समोर आली आहे.
फिल्मफेअरच्या एका वृत्तानुसार, आमिर खानला त्याचे नवं प्रेम सापडले आहे. त्याच्या आयुष्यातील ती गूढ मुलगी बेंगळुरुची आहे. अभिनेत्याच्या जवळच्या एका सूत्राने ही माहिती दिली असल्याचं समोर आलं आहे. आमिर सध्या त्याच्या प्रेयसीबद्दल काहीही सांगू इच्छित नाही. तथापि, सूत्रांनी पुष्टी केली की आमिर त्याच्या या नव्या नात्याबद्दल गंभीर आहे कारण त्याने त्याच्या मैत्रिणीची त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी ओळख करुन दिली आहे आणि ही भेटही सकारात्मक राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आमिरची नवीन साथीदार बंगळुरुची आहे. आपण त्यांच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे आणि वैयक्तिक माहिती उघड करु नये. आमिरने अलीकडेच त्या महिलेची त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी ओळख करुन दिली. आणि ही बैठक खूप चांगली झाली”.
आणखी वाचा – Video : सहा महिन्यांनी बहिणीच्या घरी पोहोचली खुशबू तावडे, विविध पदार्थ, खेळ अन् धमाल, व्हिडीओ व्हायरल
यापूर्वी, जेव्हा आमिरला त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल आणि तो तिसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे का याबद्दल विचारण्यात आले होते, तेव्हा तो म्हणाला होता की, “मी आता ५९ वर्षांचा आहे, मी पुन्हा लग्न करेन याचा विचार करणे कठीण आहे. माझ्या आयुष्यात सध्या खूप नाती आहेत, मी माझ्या कुटुंबाशी, माझ्या मुलांशी पुन्हा जोडलो गेलो आहे. माझ्या जवळच्या लोकांबरोबर राहून मला खूप आनंद होतो. मी एक चांगला माणूस बनण्यासाठी काम करत आहे”.
आमिर खानचे पहिले लग्न १९८६ मध्ये रीना दत्ताबरोबर झाले होते आणि नंतर ते २००२ मध्ये वेगळे झाले, परंतु ते त्यांच्या दोन मुलांसाठी म्हणजेच आयरा आणि जुनैदसाठी एकत्र राहिले. नंतर आमिर खान आणि किरण राव एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर, दोघांनी २००५ मध्ये लग्न केले. दोघांनाही एक मुलगा आहे. अकरा वर्षांच्या नात्यानंतर, आमिर आणि किरण यांनीही वेगळे होण्याची घोषणा केली.