काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला असल्याची बातमी ऐकून सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. आता श्रेयसची प्रकृती बरी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. लवकरच तो नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. त्याचपूर्वी श्रेयसने हृदयविकाराचा जेव्हा झटका आला तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत खुलासा केला आहे. काही मिनिटांसाठी श्वास घेणंही श्रेयसला कठीण झालं होतं. (Shreyas Talpade Health Update)
श्रेयसने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बरेच खुलासे केले. श्रेयस म्हणाला, “जोगेश्वरीमध्ये ‘वेलकम टू द’ जंगल चित्रपटाचं चित्रीकरण मी करत होतो. चित्रपटातील आर्मी ट्रेनिंगचं शूट सुरु होतं. पाण्यात उडी मारणं सारखे सीन शूट करत होतो. सगळं सुरळीत सुरु असताना शेवटच्या सीनदरम्यान मला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ लागला. माझ्या डाव्या हाताला प्रचंड वेदना होऊ लागल्या. मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनपर्यंत कसंतरी गेलो. कपडे बदलले”.
“सीन शूट करताना मला वेदना झाल्या असाव्यात असं मला वाटलं. कारमध्ये बसल्यानंतर मला असं वाटलं की, रुग्णालयामध्ये जावं. पण आधी घरी जावं असा मी विचार केला. माझी पत्नी दिप्तीने मला पाहिलं आणि १० मिनिटांमध्येच आम्ही रुग्णालयामध्ये गेलो. मी रुग्णालयाला गेट पाहिला. पण त्यानंतर माझा चेहरा सुन्न पडला. त्याक्षणी मला cardiac arrest आला. काही मिनिटांसाठी माझ्या हृदयाचे ठोकेही बंद झाले”.
श्रेयस पुढे म्हणाला, “आम्ही रुग्णालयाच्या गेटजवळच ट्राफिकमुळे अडकलो होतो. काही लोक आमच्या मदतीसाठी आले आणि मला रुग्णालयामध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी मला सीपीआर दिलं. विजेचा झटका मला देण्यात आला आणि मला डॉक्टरांनी जिवंत केलं. वैद्यकिय दृष्टीने माझं जीवन संपलं होतं. जेव्हा मी शुद्धीत आलो तेव्हा मी हसलो असं मला डॉक्टरांनी सांगितलं. आणि माझ्या पत्नीला माझी चुकी झाली असं सांगा असं मी म्हटलं”. तसेच या कठीण प्रसंगानंतर श्रेयसने सगळ्यांना स्वतःची प्रकृती सांभाळण्याचा सल्ला दिला.