बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या तिच्या मुलीच्या लग्नामुळे आणि आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ला मिळालेल्या अपयशानंतर त्याने काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेत चित्रपट निर्मितीकडे लक्ष दिले. पण आता त्याने अशी काही घोषणा केली, ज्याची जोरदार चर्चा होत आहे. २००७ मध्ये आमिरचा ‘तारे जमीन पर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कमाई केली होती. लहान मुलाच्या भावविश्वावर आधारित हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले होते. आता तब्बल १३ वर्षानंतर या चित्रपटाच्या थीमवर आधारित नवा चित्रपट येणार आहे. खुद्द आमिरने एका मुलाखतीत याची घोषणा केली आहे. (Aamir Khan announced Sitare Zameen Par)
‘न्यूज १८’ला नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने या चित्रपटाची घोषणा करताना सांगितलं की, “मी याबद्दल सार्वजनिकरित्या बोललो नाही, आणि आताही मी अधिक भाष्य करणार नाही. पण त्याचं शीर्षक मी सांगू शकतो, चित्रपटाचं नाव असेल ‘सितारे जमीन पर’. तुम्हाला माझा ‘तारे जमीन पर’ चित्रपट माहितच असेल आणि या चित्रपटाचं नाव ‘सितारे जमीन पर’ आहे, कारण आम्ही या चित्रपटाच्याच थीमवर १० पावले पुढे जात आहोत. ‘तारे जमीन पर’ भावनिक होता, तर हा तुम्हाला भरपूर हसवणार आहे. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवले असेल, तर हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल. पण थीम एकच असल्यामुळे आम्ही खूप विचार करून हे नाव ठेवलं आहे.”
पुढे तो म्हणाला, “आपल्या सर्वांमध्ये एक दोष आहे, कमतरता आहेत. पण आपल्या सर्वांमध्ये काहीतरी विशेष बाब आहे. म्हणून आम्ही ही थीम पुढे नेत आहोत. मात्र यावेळी त्या चित्रपटातील ईशान नावाचे जे पात्र आहे, त्या पात्राची मदत माझं पात्र करायचा. ‘सितारे जमीन पर’मधील ती नऊ मुलं, ज्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत. ती माझी मदत करतील. म्हणजे या कथेच्या अगदी विरुद्ध.”
हे देखील वाचा – “खूप रडणार कारण…”, लेकीच्या लग्नाची तारीख सांगत आमिर खानचं होणाऱ्या मराठमोळ्या जावयाबाबत भाष्य, म्हणाला, “मला कोण सांभाळणार?”
२००७ मध्ये ‘तारे जमीन पर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याची निर्मिती व दिग्दर्शन आमिर खानने केली होती. या चित्रपटात आमिरसह दर्शिल सफारी, तनय छेडा, टिस्का चोप्रा, विपीन शर्मा, गिरीजा ओक आदी प्रमुख भूमिकेत होते. दर्शिलने ईशानचे पात्र साकारले होते, ज्याला एका आजाराने ग्रासले होते. तेव्हा कलाशिक्षक असलेल्या आमिरने ईशानला त्या आजारातून बरे होण्यास मदत केली होती. मुलांच्या भावविश्वावर आधारित हा चित्रपट पाहून प्रेक्षक त्यावेळी भावुक झाले होते.
हे देखील वाचा – हेमांगी कवीला लॉट्री, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना दिसणार, फोटो शेअर करत म्हणाली, “काय सांगू तुम्हाला जिथे…”
आमिरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, वर्षभरापूर्वी त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट आला होता, जो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यानंतर अभिनेता चित्रपट निर्मितीकडे लक्ष देऊ लागला. तो सध्या किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’, मुलगा जुनैद खानचा एक चित्रपट आणि राजकुमार संतोषी-सनी देओलचा ‘लाहोर १९४७’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे. पण, चाहते त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत.