बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरात लवकरच लगिनघाई सुरु होणार आहे. आमिरची लेक इरा खानने काही महिन्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह साखरपूडा उरकला होता. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची तारीख जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली असून स्वतः आमिरनेच या बातमीचा खुलासा केला आहे. (Aamir khan announced his daughter marriage date)
न्यूज १८ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आमिरने इरा व नुपूर यांच्या लग्नाची मुहुर्त गाठ ३ जानेवारीला बांधणार असल्याचं सांगितलं. या दोघांचा साखरपुडा वर्षाच्या सुरवातीलाच कुटुंबियांच्या उपस्थितीत उरकला होता. त्यानंतर हे दोघं यावर्षीच्या शेवटपर्यंत लग्न करतील असं म्हटलं जात होतं. पण आता आमिरने लग्नाच्या तारखेबाबत स्पष्ट केलं आहे. २०२४च्या सुरुवातीला तो मुलीचं लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. त्याने हे ही सांगितल की, इराच्या लग्नाबाबत तो खूप इमोशनल आहे आणि तो कुटुंबाला मानसिकदृष्ट्या तयार करत आहे.
आमिर नुपूरबाबत बोलताना म्हणाला, “इराचं लग्न ३ जानेवारीला करणार असल्याचं ठरवलं आहे. तिने निवडलेला मुलगा खूप गोड आहे. खरतर त्याचं टोपणनाव पोपोय आहे आणि तो एक ट्रेनर आहे. त्याचे हात पोपायसारखे आहेत पण त्याचं नाव मात्र नुपूर आहे. तो खूप छान मुलगा आहे. जेव्हा इरा नौराश्येशी झुंज देत होती, तेव्हा तो नेहमी तिच्याबरोबर उभा होता. तो आजही सगळ्या परिस्थितीत तिच्याबरोबर उभा आहे. तो नेहमी तिला भावनिक आधार देत आला आहे. तिने असा माणूस निवडला याचा मला आनंद आहे. ते एकत्र खूप आनंदी असतात, खूप काळजीही घेतात. ते एकमेकांबरोबर जोडले गेले आहे”.
आमिर पुढे सांगतो, “हा एक फिल्मी डायलॉग वाटेल पण मला नुपूर मुलासारखा वाटतो. तो खूप छान मुलगा आहे. आम्हाला तो आमच्या कुटुंबाचाच एक भाग वाटतो”. लग्नात तु भावुक होणार का?, असा त्याला प्रश्न विचारला असता त्यावर आमिर सांगतो, “मी खूप भावनिक व्यक्ती आहे. लग्नाच्या दिवशी मी खूप रडणार हे निश्चित. मी खूप भावनिक असल्यामुळे त्या दिवशी मला कोण सांभाळेल याबाबत माझ्या घरात चर्चा सुरु झाली आहे. मला माझं हसू व अश्रू कधीच आवरता येत नाहीत”, असं सांगत आमिरने इराच्या लग्नावेळी त्याची बाप म्हणून काय अवस्था होणार हे ही स्पष्ट केलं.