छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही मालिका घराघरात मोठ्या आवडीने पहिली गेली. आज या मालिकेची लोकप्रियता कमी झाली असली तरी प्रेक्षकांचा मालिकेला व मालिकेतील कलाकारांना उदंड प्रतिसाद लाभताना दिसतोय. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मधूराणी गोखले प्रभूलकर. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिने तिच्या कारकिर्दीत मालिकांबरोबरच अनेक चित्रपटातही काम केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. (Madhurani Prabhulkar New Home)
अभिनेत्री सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच अभिनेत्रीने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. मधूराणीच्या नवीन घराची स्वप्नपूर्ती झाली असून याच स्वप्नपूर्तीचा आनंद तिने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. मधूराणीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमधून तिच्या घराची खास झलक पाहायला मिळत आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध ठिकाणी तिने हे घर घेतलं असून याच ठिकाणी तिचे नवीन घर घ्यायचे स्वप्न होते असं या पोस्टमधून तिने म्हटलं आहे.
मधूराणीने आपल्या घराचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “मुंबईत आपलं स्वतःचं घर असावं आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न होता. ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आंनद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे. आज मन कृतज्ञतेने भरून आलं आहे. आई-वडिलांचे आणि सर्व थोरा-मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ यामुळेच हे स्वप्न साकार झालं आहे”. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आपल्या लेकीसह नवीन घराची पाहणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच मधूराणीची लेकही हे नवीन घर पाहून आनंदी झाली असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – Video : अन् ‘बिग बॉस मराठी’च्या घरातले सगळेच सदस्य रडू लागले, पण नेमकं झालं काय? पाहा हा भावुक प्रोमो
अभिनेत्रीने ‘आई कुठे काय करते?’ याच मालिकेतील ‘सुखाचे चांदणे’ हे गाणं लावत हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मधूराणीच्या चेहऱ्यावर नवीन घरच्या स्वप्नपूर्तीचा व तिच्या लेकीच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहताना दिसत आहे. दरम्यान, मधूराणीने शेअर केलेल्या या नवीन घराच्या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत, सुकन्या मोने यांनीही कमेंट्स करत मधूराणीला नवीन घरानिमित्त शुभेच्छा देत तिचे कौतूक केलं आहे. त्याचबरोबर मधूराणीच्या अनेक चाहत्यांनीदेखील या व्हिडीओखाली लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.