मराठी मालिकाविश्वातीत लोकप्रियतेचं शिखर गाठवणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’ मालिका. २०१९पासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यानंतर तब्बल पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलाच खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील सातत्याने बदलणारे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड रंटाळवाणे वाटले. त्यामुळे प्रेक्षक ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद करण्याची मागणी करत होते. (Madhurani Prabhulkar Write Emotional Letter to Arundhati)
काही महिन्यांपूर्वी मालिकेची वेळ बदलण्यात आली. दुपारी २.३० वाजताची वेळ ‘आई कुठे काय करते’ मालिकेला देण्यात आली. पण, आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच ती महाराष्ट्राची लाडकी आई ठरली. त्यामुळे आता या महाराष्ट्राच्या लाडक्या आईला निरोप देताना स्वत: अरुंधती भावुक झाली आहे. मालिका बंद होत असल्यामुळे मधुराणीने अरुंधतीसाठी एक भावुक पत्र लिहिलं आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मधुराणीने अरुंधतीसाठी भावुक पत्र लिहिलं आहे.
यावेळी पत्राचं वाचन करत मधुराणी म्हणाली की, “प्रिय अरुंधती, खरंतर आता मी भावनाविवश झाली आहे. गेली पाच वर्ष तू आणि मी जणू एकरुप झालो. किती दिलं आहेस तू मला. किती शिकवलं आहेस. स्वत्वाची जाणीव करुन दिली आहेस. स्वाभिमान शिकवला आहेस, आत्मभान दिलं. स्वतःसाठी उभं राहण्याचं बळ दिलं आणि साहसही दिलं आहेस. तुला (अरुंधतीला) निभावताना माझी मी पाझरत राहिले आणि मी माझी मला नव्याने सापडले. माझ्या घडण्यात तुझा किती मोठा वाटा आहे, हे कसं सांगू तुला?”
यापुढे ती असं म्हणाली की, “तुझ्यामुळे मला मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, स्नेह मिळाला. तुझ्यामुळे माझं अनुभवविश्व कितीतरी समृद्ध झालं. आत्मा जसा एक देह त्याग करुन दुसरा देह आपलासा करतो, तशी ही मधुराणी दुसऱ्या देहाच्या शोधात असेल. पण, तुझ्याबरोबर प्रवासातल्या आत्म्यावर उमटलेल्या खोलवरच्या खाणा-खुणा असतीलच. ती जगाकडे आणि स्वतःकडे तिच्याबरोबरच तू दिलेल्या दृष्टीतूनच बघेल.”