Milind Gawali Father Birthday : चित्रीकरणामुळे कलाकार मंडळींचं आयुष्य हे नेहमीच व्यस्त असलेलं पाहायला मिळतं. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांना बरेचदा त्यांच्या कुटुंबासह काही खास क्षणांना वेळ घालवणं कठीण जातं. ही कलाकार मंडळी तरीदेखील त्याच्या शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबियांना वेळ देतात. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील एका कलाकाराने त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे आणि मालिकेमुळे वेळ देता न येणाऱ्या त्याच्या भावांना या पोस्टमधून मांडल्या आहेत. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केलीय आणि सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मिलिंद यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “काल माझ्या वडिलांचा वाढदिवस आणि या वेळेला नशिबाने मला त्यांच्याबरोबर घरी राहायला मिळालं. नाहीतर गेल्या काही वर्षांमध्ये मालिकेच्या शूटिंगमुळे पूर्ण वेळ मला त्यांना देता आला नाही. गेल्या पाच सात वर्षांमध्ये, फक्त दोन वेळा त्यांच्याबरोबर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण दिवस राहता आलं आणि दोन वेळेस शूटिंग संध्याकाळपर्यंत करुन मग रात्री त्यांच्याबरोबर वेळ घालवला आणि दोन-तीन वेळातर शूटिंग मुळे त्यांच्या वाढदिवसाला मला अजिबात वेळ घालवता आला नाही. बरं माझे वडील असे आहेत की, माझं काम सुरु असेल तर ते स्वतःच मला म्हणतात, काम महत्त्वाचं आहे. आपला वाढदिवस साजरा नाही केला तरी चालतं. त्यादिवशी आपल्याला जन्म देणाऱ्या आईचे स्मरण करायचं असतं”.
पुढे त्यांनी असं लिहिलं आहे की, “आपला वाढदिवस असला तर त्यात आपल्याला जन्म देणार्या आपल्या आईचं महत्त्व असतं, कारण त्या दिवशी त्या आईने आपल्याला जन्माला घातलेलं असतं आणि जन्मदिवसाच्या आधी तिने नऊ महिने खूप यातना सोसल्या असतात, त्यामुळे आठ डिसेंबर हा खरतर माझ्या आजीचा दिवस , तिचं नाव होतं सोनुबाई अश्रू गवळी. माझ्या वडिलांचा कष्ट करायचा जो स्वभाव आहे तो तिच्याकडूनच आला असावा. खरंच माझे वडीलच इतके ग्रेट आहेत तर त्यांची आई किती ग्रेट असेल. आज वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आजीच्या कष्टाचं आणि त्यागाच स्मरण आणि आनंददायी, प्रेमळ आठवणी जाग्या झाल्या”.
आणखी वाचा – ‘पुष्पा-२’ वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटात करणी सेनेचा अपमान झाल्याचा आरोप, म्हणाले, “घरात घुसून…”
‘आई कुठे काय करते’ या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन केले. आणि आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. इतकंच नाही तर प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने घर केलं. मालिकेतील मिलिंद गवळी यांनी साकारलेल्या अनिरुद्धच्या भूमिकेने प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावर मिलिंद बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत असतात.