कलाकारांच्या आयुष्यामधील प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यास चाहत्यांना अधिक रस असतो. अनेक कलाकारही त्यांच्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे राधा सागर. राधाने सध्या कलाक्षेत्रामधून ब्रेक घेतला आहे. त्याचं कारणंही तितकंच खास आहे. राधाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत गरोदर असल्याची बातमी सगळ्यांना दिली.
राधाने काही महिन्यांपूर्वी गरोदर असल्याचं सांगितलं आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. शिवाय गरोदरपणामध्ये तिने केलेलं फोटोशूटही चर्चेचा विषय ठरलं होतं. आता तिच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. राधाने एक सुंदर फोटो शेअर करत नव्या पाहुण्याचं घरी आगमन झालं असल्याचं सांगितलं. तसेच खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला.
आणखी वाचा – “तू मोठी झालीस पण…”, मिताली मयेकरच्या वडिलांची लेकीसाठी भावुक पोस्ट, म्हणाले, “२७ वर्षांपूर्वी तू…”
“आमच्या आयुष्यामधील सगळ्यात सुंदर क्षण. आम्हाला मुलगा झाला आहे. या मुलामुळे आम्ही आनंदाचा क्षण अनुभवला. आम्हाला आई-बाबा केल्याबाबत तुझे आभार. आता आम्ही अगदी आनंदी पालक आहोत” असं राधाने म्हटलं आहे. राधाच्या या पोस्टनंतर कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनीही राधाला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राधाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासह पती व चिमुकल्याचा हात दिसत आहे. हा फोटो अगदी लक्षवेधी आहे. ‘आई कुठे काय करते’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. आता तिने काही काळ कामामधून ब्रेक घेतला आहे. लग्नाच्या १० वर्षानंतर आई झाल्याचा आनंद ती सध्या अनुभवत आहे.