छोटा पडदा म्हणजेच टेलिव्हिजन हा कायमच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सोयीचा व फायद्याचे माध्यम ठरला आहे, त्यामुळे निर्मातेही या माध्यमावर प्रेक्षकांसाठी कायमच नवनवीन मालिका घेऊन येत असतात. अशातच नुकतीच एका मालिकेची घोषणा करण्यात आली असून या मालिकेची व मालिकेतील कलाकारांची सध्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाहवर लवकरच नव्या मालिका सुरू होणार असून यापैकी दोन मालिकांची नावे १ सप्टेंबर रोजी समोर आली आहेत. सर्वात आधी ‘उदे गं अंबे’ या मालिकेची घोषणा झाली आणि त्यानंतर निवेदिता सराफ यांच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आणि या मालिकेचे नाव आहे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’. (Aai Aani Baba Retire Hot Aahet New Serial)
नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये निवेदिता एका आईची भूमिका साकारत आहेत जी आई घरासाठी सर्वकाही करते. मुलगा-सुनेला ऑफिससाठी डब्बा देण्यापासून ते नातीच्या केसांच्या वेण्या घालण्यापर्यंत आई सर्व कामे करत असते. तर मंगेश हे त्यांच्या कामातून निवृत्त होत आहेत आणि निवृत्तीनंतर या ‘आई-बाबां’ची गावी जाण्याची योजना असते. आईला मात्र मुलांना सोडून गावी जाणे फारसे पटलेले नसते. असं दिसून येत आहे. या नवीन मालिकेत मंगेश आणि निवेदिता यांच्या व्यतिरिक्त इतर कोणते कलाकार आहेत? याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. शिवाय मालिका कधीपासून सुरु होणार?, हेदेखील गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
छोट्या पडद्यावर आता पुन्हा एकदा एक नवीन विषय पाहायला मिळणार असल्यामुळे काहींनी याबद्दल उत्सुकता दाखवली आहे. तर काहींना हाअ विषय पटलेला नाही आणि मालिकेबद्दलचं मत त्यांनी सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे व्यक्त केलं आहे. या मालिकेच्या प्रोमोवर चाहत्यांच्या काही रंजक कमेंट करत या मालिकेबद्दलची त्यांची मतं व्यक्त केली आहेत. तसंच ही मालिका याच वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’सारखी असल्याचेही म्हटलं आहे.
या नवीन प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत असं म्हटलं आहे की, “अरुंधती अल्ट्रा प्रो मॅक्स लवकरच येत आहे”, “आई कुठे काय करते २.०”, “हॉरर मालिका आणा एक तरी, सर्व घरघुती मालिका खूप आहेत. जसं की ‘सांग तु आहेस का?’चा दूसरा भाग. काहीतरी नवीन”, ‘नक्कीच ‘बागबान’ची कथा असणार”, “मराठी सिनेमा ‘तू तिथे मी’ची कॉपी वाटतेय, तिथे त्यांची मुलं आणि सूना मनाने चांगली दाखवली होती, आता ही सीरियल आहे म्हणजे हेवे दावे असणार मुलं आणि सूनांचे, ‘बागबान’सारखे”. या काही नकारात्मक कमेंट्सशिवाय काही सकारात्मक कमेंट्सही आल्या आहेत.
“आई-बाबांना कधीच मुलं आणि सुना रिटायर होऊ देत नाहीत. हीच मालिकेची संकल्पना दिसतेय”, “खूप साधा आणि सोपा प्रोमो आहे, कोणतीच नकारात्मकता नाही, भपकेपणा नाही”, “खूप छान, “खूपच भारी’ अशा अनेक कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. तसंच अनेकांनी निवेदिता यांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून आनंद व्यक्त केला आहे. अनेक कलाकारांनीदेखील याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.