‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून “दार उघड बये दार उघड” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते, निवेदक म्हणजे आदेश बांदेकर. आदेश बांदेकर हे मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. महाराष्ट्रासह भारतभर आणि भारताबाहेरही ते जात असतात. याच प्रवासादरम्यानचे अनुभव, किस्से, काही खास आठवणी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक छान व्हिडीओ शेअर केला आहे.
आदेश ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमानिमित्त ते सध्या अमेरिकेला गेले असून तिथे त्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. आदेश यांना परदेशात भारतीय कथ्थक नृत्य प्रकाराचे शिक्षण दिले जात असल्याचे कळले. त्याचबरोबर हे शिक्षण एक भारतीय मराठी महिला देत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. प्रत्येक भारतीयासाठी ही एक अभिमानाची व आनंदाची बातमी असून हाच आनंद आदश यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे. आदेश बांदेकर हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपल्या कामानिमित्त काही मजेदार घटना किंवा प्रसंगे शेअर करत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
या व्हिडीओमध्ये आदेश यांनी असं म्हटलं आहे की, “अमेरीकेत मी वेस्ट ग्रू येथे माझ्या मित्राच्या घरी आलो असून इथे येताच मला भारतीय नृत्य कलाप्रकारचे बोल माझ्या कानावर पडले. इथे राधिका जोशी कथ्थकचे क्लासेस घेतात आणि आपली परंपरा, संस्कृती जपतात. राधिका जोशी अमेरिकेत कथ्थकचे मार्गदर्शन करुन अनेक माऊलींना शिक्षण देतात”. यापुढे त्यांनी राधिका जोशी यांचे कौतुक केलं आहे. तसेच कानांवर पडणाऱ्या कथ्थकच्या सुरांमुळे कान तृप्त झाल्याची भावनादेखील व्यक्त केली आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये पुढे त्यांनी वेस्ट ग्रू येथील त्या वास्तूची संपूर्ण झलकही दाखवली आहे. अगदी प्रशस्त व भव्य असं हे घर असून राधिका जोशींनीही आदेश यांचे आदरातिथ्य केलेलं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अमेरिकेत आदेश यांनी त्यांच्या काही मित्रांबरोबर केलेली मजामस्तीही सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. आदेश खास क्षणांना अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत कौतुक केलं आहे.