मराठी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे प्रिया बापट. प्रियाने आजवर अनेक सिनेमे, नाटक, मालिका आणि वेब सिरीजमध्ये काम केलं असून आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत तिने बरंच नाव कमावलंय. काही दिवसांपूर्वी प्रिया ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसली होती. नुकतंच प्रियाने एक मुलाखत दिली, ज्यात प्रिया होत असलेल्या ट्रोलिंगवर स्पष्टपणे बोलली.(Priya Bapat Intimate Scene controversy)
‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या पहिल्या सीझनमध्ये प्रियाने एक बोल्ड सीन दिला होता, ज्याची जोरदार चर्चा रंगली. सीरिजमधला तो सीन व्हायरल झाल्यानंतर प्रियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर बोलताना प्रिया म्हणाली, “पूर्वी मी ट्रोलिंगला प्रतिसाद द्यायचे. पण आता मी मनावर घेत नाही. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सिरीजच्या पहिल्या सीझननंतर मला बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझननंतर त्याच लोकांनी माझं कौतुकही केलं. त्यामुळे मी कुठे असावं, माझ्या कामावर मी किती श्रद्धा ठेवावी, मी प्रामाणिकपणे मेहनत करत राहावं एवढंच माझ्या हातात आहे.”

प्रियाने पुढे त्या सीनबद्दल बोलताना ठाम मत मांडत सांगितलं की, “मराठी अभिनेत्री हिंदीत गेली की, हिंदीत तिला काम मिळावं म्हणून तिनं इंटिमेट सीन्स केले असं म्हटलं जातं. पण मग दीपिका पदुकोण ‘गेहराइयाँ’मध्ये तसेच सीन्स करते तेव्हा तिला ट्रोल केलं जात नाही. तेव्हा तुम्ही त्याकडे कलाकार आणि परफॉर्मन्स म्हणून बघता. मला मात्र ‘इंटिमेट सीन केलेस. तुला कसं वाटलं ?’ असा प्रश्न विचारला जातो.”
“मुळात हा प्रश्नच का येतो ? माझ्या कामाचा भाग म्हणून लोक त्याकडे का नाही बघत ? कथेचा, कामाचा भाग म्हणून मी ते केलं, तिथे विषय संपला. इतर भाषिक कलाकारांनी असे सीन्स केले तर त्यांना त्याबाबत विचारलं जातं का ? मग आपणच ते प्रश्न विचारून अधोरेखित का करतो ? मला त्यावर चर्चा करणंच महत्त्वाचं वाटत नाही. कामाचा भाग म्हणून मी एखाद्या सीनमध्ये रडते तसंच दुसऱ्या सीनमध्ये काम म्हणूनच मी इंटिमेट सीनही करते.” असं उत्तर देत प्रियाने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलंय.(Priya Bapat Intimate Scene controversy)
