साऊथचा सुपरस्टार प्रभास व KGF फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांचा आगामी बहुचर्चित सिनेमा ‘सालार’चा टीजर आज रिलीज झाला. ३ कोटींहून अधिक लोकांनी आतापर्यंत सिनेमाचा टीजर पहिला असून काही चाहते सोडता अनेक नेटकरी मात्र नाराज आहेत. सोशल मीडियावरही सिनेमाचा टीजर ट्रेण्डिंगमध्ये असून त्याच्याबरोबर #Disappointed हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
१ मिनिट ४५ सेकंदाच्या या टीजरमध्ये प्रभासची छोटीशी झलक टीजरमध्ये दिसत असून सिनेमातील डार्क बॅकग्राउंड, डायलॉग्ज पाहता अनेकांना सिनेमाचा टीजर ब्लॉकबस्टर ‘KGF ३’चीच कॉपी असल्याचे वाटत आहे. एका नेटकाऱ्याने यावर लिहिलंय, “निराश #SalaarTeaser. बहुतेक KGF ची कॉपी करत आहे. ब्लॅक थीम कॉपी, बॅकग्राउंड कॉपी, इंग्रजी डायलॉग कॉपी. पूर्णपणे केजीएफचा रिमेक… ओन्ली यश (रॉकी भाई) #Salaar हिट होऊ शकत नाही, दुसरा सर्वात मोठा फ्लॉप.”
मात्र काहींना सिनेमाचा टीजर आवडला असून प्रभासच्या स्क्रीन प्रेझेन्स आणि अॅक्शन सीक्वेन्सचे कौतुक केले. नेटकऱ्यांनी टीजरला KGF शी जोडला असून प्रशांत नीलच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग असल्याचे मत व्यक्त केलंय.
या सिनेमात प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमारन, टिनू आनंद, श्रुती हसन, जगपती बाबू व अन्य कलाकार दिसणार असून 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा 28 सप्टेंबरला हिंदीसह ४ प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज होणार आहे.