मराठी सिनेसृष्टीमधील अनेक कलाकारांना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी कुणीही मदत केली नाही. स्वतः मेहनत घेत या कलाकारांनी आपली वेगळी वाट निवडली आणि अथक परिश्रमाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान मिळवलं आणि आपली ओळख निर्माण केली. अशा काही कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. अभिजीतने आजवर अनेक नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मालिकांमधून तो घराघरांत पोहोचला. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच चर्चेत राहत असतो. सोशल मीडियावर तो अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर भाष्य करत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Abhijeet Kelkar Social Media Post)
आजवर अनेक मालिकांमधून काम केलेल्या अभिजीतने नुकतीच झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एन्ट्री झाली आहे. या मालिकेतून तो केदारची भूमिका साकारत आहे. याबद्दल त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिजीतने इन्स्टाग्रामवर मालिकेचे पोस्टर शेअर करत असं म्हटलं आहे की, “मी, बऱ्याच वर्षांनी, झी मराठीवर काम करत आहे. त्यात ऊन पाऊस नंतर पहिल्यांदा मी ब्रेक बंपर वर आलो आहे. मधल्या काळात, सगळंच खूप खूप जास्त बदललं आहे, त्यातल्या त्यात माझा कामाबद्दल असलेला प्रामाणिकपणा, खरेपणा, आवड, समर्पण हे सगळंच मी जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवलं आहे”.
यापुढे अभिजीतने असं म्हटलं आहे की, “अनेकदा संयमाने, आत्मविश्वासाने, जवळच्या भासणाऱ्या मित्र, नातेवाईकांनी ही साथ सोडली होती. पण मुळात असलेला, हार न मानण्याचा स्वभाव, लढण्याची जिद्द, कुठलंही चांगलं काम करण्याची तयारी आणि अर्थातच बायको आणि काही मोजक्याच जवळच्या लोकांची असलेली साथ यावर, अनेकदा कोलमडूनही परत परत उभा राहिलो आहे आणि यापुढे राहीन. मुलांमुळे, मुलांसाठी जीवात जीव आणला आहे.. बच्चन साहेबांमुळे प्रेरणा येत राहिली आहे. परिस्थितीशी लढणं आणि पाय घट्ट रोवून उभं राहणं एवढंच आपल्या हातात असतं”.
आणखी वाचा – Appi Aamchi Collector : गंभीर आजाराचा अमोलला पुन्हा त्रास, अप्पी-अर्जुनला त्याच्या आजारपणाविषयी कळणार का?
दरम्यान, या पोस्टवर संग्राम समेळ, अभिषेक राहाळकर यांनी कमेंट्स केल्या आहेत. तर अभिजीतच्या अनेक चाहत्यांनीही या पोस्टवर कमेंट करत “तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे”, “तुमच्यामुळे मालिका बघायला मजा येते” अशा कमेंट्स केल्या आहेत. तसंच त्याला या पोस्टखाली कमेंट्सद्वारे उभारी देण्याचाही प्रयत्न केला आहे.