Appi Aamchi Collector : झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. अप्पी आणि अर्जून यांच्यामधली प्रेम, मैत्री, भांडण, गैरसमज या सगळ्यामुळे प्रेक्षकांना पुढील भागात काय होईल याची कायम उत्सुकता लागलेली असते. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने तब्बल आठ वर्षांचा लीप घेतला होता. आठ वर्षानंतर अप्पी तिचा मुलगा अमोलला घेऊन पुन्हा एकदा पुण्यात राहायला येते आणि मग अर्जुनची त्यांच्याशी भेट होते. अमोलमुळे अप्पी व अर्जुन एकमेकांबरोबर राहू लागतात, पण तरीही त्यांना एकमेकांच्या काही गोष्टी पटत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडत असतात. पण अमोल त्यांना सतत एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. (Appi Aamchi Collector Serial Update)
आई-वडिलांनी एकत्र राहावं आणि त्यांच्यात प्रेम कायम टिकावं यासाठीदेखील तो प्रयत्न करताना दिसतो. नुकताच मालिकेत अमोलला आजार झाल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल अप्पी व अर्जुन यांना काही माहिती नाही. पण आता त्या दोघांना अमोलच्या आजाराविषयी माहिती पडणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे, ज्यात अमोलचा आजार पुन्हा बळावल्याचे पाहायला मिळत आहे. अप्पी व अर्जुन यांनी एकमेकांची माफी मागत एकत्र येणार असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर अमोल त्याच्या आई वडिलांची लव्हस्टोरी बघण्याचा हट्ट करतात. या हट्टामुळे अप्पी व अर्जुन त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात.
अशातच आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात अप्पी व अर्जुन यांनी लग्नाआधी गेलेल्या ठिकाणी भेट देतात. यावेळी त्यांच्याबरोबर अमोलही असतो. या प्रोमोमध्ये अप्पी अर्जुनला असं म्हणते की, “सगळ्यात आधी प्रेमात कोण पडलं? मी की तू?”. यावर अमोल “सगळ्यात शेवटी मी सांगतो” असं म्हणतो. यावर अप्पी त्याला ओरडते आणि असं म्हणते की, “खूप आगाऊ झाला आहेस” असं म्हणते. त्यानंतर दोघे पुढे जातात आणि अमोलही त्यांच्या मागेमागे जात असताना त्याला चक्कर येते आणि तो कोसळतो.
दरम्यान, अमोलला झालेला हा गंभीर आजार नेमका काय आहे? याबद्दल अप्पी व अर्जुन यांना माहिती होणार का? यामुळे या तिघांचे नाते आता आणखी घट्ट होणार की पुन्हा या तिघांच्या नात्यात काही संकट येणार? हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी भागासाठी उत्सुकता लागून राहिली आहे.